आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 मे 2017

बळवंत माणिकराव महल्ले, रणधीर प्रल्हादराव सावरकर, प्रकाश गोपाळराव पोहरे, हृषिकेश प्रकाश पोहरे व अनुप संजय धोत्रे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई : विक्रोळी-पूर्व येथील पुनर्विकास प्रकल्पाच्या बांधकामाची साडेसहा कोटींची बिले थकवून व्यावसायिकाची फसवणूक केल्याप्रकरणी विक्रोळी पोलिसांनी शनिवारी (ता. 27) फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. कंपनीचे नोंदणीकृत भागीदार नसूनही आरोपींनी कंपनीच्या नावाने बॅंक खाते उघडून आर्थिक व्यवहार केला, असा आरोप तक्रारदार व्यावसायिकाने केला आहे. 
बळवंत माणिकराव महल्ले, रणधीर प्रल्हादराव सावरकर, प्रकाश गोपाळराव पोहरे, हृषिकेश प्रकाश पोहरे व अनुप संजय धोत्रे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार सचिन काळे हे नवी मुंबईतील रहिवासी आहेत. ते मेसर्स धनलक्ष्मी बिल्डटेक कंपनीचे भागीदार असून, बांधकाम व्यवसायात आहेत. 2011 मध्ये काळे यांच्याकडे "धनलक्ष्मी एंटरप्रायजेस'चे भागीदार सुरेश मोरे यांनी कन्नमवार नगर येथील पुनर्विकास प्रकल्पाच्या बांधकामाचा प्रस्ताव मागवला होता. तो काळे यांनी दिल्यानंतर 2 सप्टेंबर 2011 मध्ये धनलक्ष्मी एंटरप्रायजेसने त्याला मंजुरी दिली. त्याबाबत 5 ऑक्‍टोबर 2011 मध्ये काळे व मोरे यांच्यात करार झाला आणि धनलक्ष्मी बिल्डटेकच्या नावाने काळे यांना वर्क ऑर्डर मिळाली. त्यानुसार काळे यांनी बांधकामाला सुरुवात केली. दुसऱ्या मजल्याचे काम सुरू झाल्यानंतर काळे यांनी बांधकामाचे पहिले बिल "धनलक्ष्मी एंटरप्रायजेस'ला सादर केले. त्या वेळी 6 मार्च 2012 रोजी बळवंत महल्ले व रणधीर सावरकर यांनी काळे यांना "धनलक्ष्मी एंटरप्रायजेस'च्या नावाने बिलाच्या अर्ध्या रकमेचा म्हणजेच 45 लाखांचा धनादेश दिला. पुढे 86 टक्के काम पूर्ण झाल्यावर काळे यांनी बांधकामाची थकीत साडेसहा कोटींची रक्कम महल्ले व सावरकर यांच्याकडे मागितली असता, त्यांनी काळे यांना शिवीगाळ केली आणि करारनाम्यातील रक्कम कमी करून सदर बिल पुन्हा पाठवण्यास सांगितले. तसेच 23 जुलै 2013 मध्ये काळे प्रकल्पाच्या ठिकाणी गेले असता, त्यांना मज्जाव करण्यात आला. त्या वेळी रणधीर सावरकर याने त्याच्याकडील रिव्हॉल्व्हर काढून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी काळे यांच्या तक्रारीवरून अदखलपात्र गुन्हाही दाखल करण्यात आला होता. त्या वेळी काळे यांनी तत्कालीन पोलिस उपायुक्त, पोलिस आयुक्त व गृहमंत्र्यांकडे या प्रकरणी तक्रारही केली होती. त्यानंतर काळे यांनी उच्च न्यायालयात "धनलक्ष्मी एंटरप्रायजेस'विरोधात थकीत बिलाबाबत याचिका दाखल केली. त्यानंतर या कंपनीबाबत काळे यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत माहिती मागवली असता, त्यात सुरेश मोरे, रवींद्र कुळे व सोपन बोराडे या तीन व्यक्तीच धनलक्ष्मी एंटरप्रायजेसच्या भागीदार असल्याची माहिती मिळाली. बळवंत महल्ले, रणधीर सावरकर, प्रकाश पोहरे, हृषिकेश पोहरे व अनूप धोत्रे हे नोंदणीकृत भागीदार नसून, त्यांनी धनलक्ष्मी एंटरप्रायजेस या नावाने दुसरे बॅंक खाते उघडून काळे यांच्याशी आर्थिक व्यवहार केला. कंपनीशी कोणताही संबंध नसूनही त्यांनी धनलक्ष्मी एंटरप्रायजेस या नावाने काळे यांच्यासोबत व्यवहार केला. 

महाराष्ट्र

मुंबई - राज्यातील पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी राबवण्यात येत असलेल्या महाराष्ट्र पर्यटन धोरणानुसार संबंधित संस्थांच्या...

02.57 AM

मुंबई  - जिल्हा परिषदेची विशेष सभा बोलावण्यासाठी आता किमान दोन पंचमांश सदस्यांनी लेखी विनंती करणे आवश्‍यक आहे....

02.33 AM

मुंबई - कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या कॉंग्रेस सोडण्याच्या निर्णयाचे काऊंटडाऊन सुरू...

02.03 AM