राणेंच्या गणपतीचे मुख्यमंत्र्यांकडून दर्शन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 ऑगस्ट 2017

राणे यांचा भाजप प्रवेश 27 ऑगस्टला होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री राणेंच्या घरी गेले होते, याबाबत चर्चांना उधाण आले आहे.

मुंबई : राज्याच्या राजकारणातही सध्या सणासुदीचा काळ आहे. काँग्रेसचे नेते नारायण राणे यांच्या भाजपप्रवेशाने राजकिय वातावरण ढवळून निघाले आहे. राणेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेबरोबरच त्यांच्या घरच्या गणपतीचे दर्शन घ्यायला कोण कोण जाणार याबाबत अटकळ बांधली जात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राणेंच्या घरी जात गणपतीचे दर्शन घेतले. 

गेल्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राणे यांच्या घरी जात गणपतीचे दर्शन घेतले होते. राज्यातील मोठ्या संख्येने निघणाऱ्या मराठा मोर्च्यांच्या पार्श्वभूमीकडे पाहता या सदिच्छा भेटीने राज्याच्या राजकारणात चर्चेला उधान आले होते. त्यामुळे राणेंच्या राष्ट्रवादीच्या प्रवेशाच्या वावड्याही जोरात उठल्या होत्या. मात्र ती भेट फक्त कौटूंबिक असल्याचे दोन्ही नेत्यांनी सांगितले होते. तरीही राजकिय पंडितांमध्ये या गणेश पुजनाच्या भेटीचे राजकिय आंदाज बांधले होते. त्यानंतर वर्षभरामध्ये बऱ्याच उलथापालथ होत राणे भाजपच्या प्रवेशद्वारी आले आहेत. लवकरच राणे भाजपमध्ये जाणार असे बोलले जात आहे. त्यामुळे त्यांच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी यावेळी कोण कोण जाणार याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

राणे यांचा भाजप प्रवेश 27 ऑगस्टला होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री राणेंच्या घरी गेले होते, याबाबत चर्चांना उधाण आले आहे.