"ई-पॉज'द्वारे धान्य वाटपाची कार्यवाही त्वरित पूर्ण करा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 जून 2017

राज्यातील 51 हजार धान्य दुकानांपैकी 43,673 दुकानांत ई-पॉज मशीन बसवली आहेत. याद्वारे 31 लाख शिधापत्रिकाधारकांनी धान्य खरेदी केले. संगणकीकरणांतर्गत धान्य वितरणाची संपूर्ण माहिती संकेतस्थळावर डॅशबोर्डच्या माध्यमातून देण्यात येत आहे. एसएमएसद्वारे मोबाईलवरही माहिती दिली जात असून, यात आणखी काही लाभार्थी समाविष्ट केले जातील. यामुळे संपूर्ण यंत्रणा पारदर्शक होईल. 
- गिरीष बापट, अन्न व नागरी पुरवठा मंत्री 

मुंबई - सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे संगणकीकरण करून सर्व रास्त भाव धान्य दुकानांत ई-पॉज यंत्रणेद्वारे धान्य वाटप करण्याची कार्यवाही पूर्ण करावी. अन्न व नागरी पुरवठा विभागाचा सर्व डाटा साठवण्यासाठी क्‍लाऊड कॉम्प्युटिंगचा वापर करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (ता. 28) दिले. 

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाची आढावा बैठक बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यांनी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेतला. या वेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट उपस्थित होते. सार्वजनिक वितरण प्रणालीचे संगणकीकरण करताना आतापर्यंत 1 कोटी 47 लाख शिधापत्रिकांपैकी 1 कोटी 16 लाख शिधापत्रिकांचे आधार कार्ड लिंक झाले आहेत. उर्वरित शिधापत्रिकांची प्रक्रिया लवकरच पूर्ण करावी. सर्वच योजनांसाठी आधार सिडिंगचा वापर करण्याबाबत विचार करण्यात यावा, अशी सूचनाही या वेळी मुख्यमंत्र्यांनी केली. ई-पॉज यंत्रणा नसलेल्या धान्य दुकानांमध्ये तातडीने ही यंत्रणा बसवावी, असेही ते म्हणाले. 

विदर्भ व मराठवाड्यातील 14 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना अन्न सुरक्षा योजनेद्वारे अन्नधान्य वाटप केले जात आहे. या योजनेपासून दूर असलेल्या शेतकऱ्यांनाही लवकरच समाविष्ट करावे. त्यांच्या शिधापत्रिकाही आधार कार्डशी लिंक कराव्यात, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली.