अर्ध्या किमतीत आणल्या बंगालमधून बनावट नोटा 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 सप्टेंबर 2017

मुंबई - बनावट नोटांप्रकरणी अटक करण्यात आलेल्या खुद्दुस बेग याने पश्‍चिम बंगालमधून अर्धी किंमत देऊन त्या नोटा खरेदी केल्याचे पोलिस चौकशीत उघड झाले आहे. त्याने दहा लाखांच्या नोटा आणल्या होत्या. 

मुंबई - बनावट नोटांप्रकरणी अटक करण्यात आलेल्या खुद्दुस बेग याने पश्‍चिम बंगालमधून अर्धी किंमत देऊन त्या नोटा खरेदी केल्याचे पोलिस चौकशीत उघड झाले आहे. त्याने दहा लाखांच्या नोटा आणल्या होत्या. 

महसूल गुप्तवार्ता विभागाच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांना ठाण्यातील मुंब्रा परिसरात आलेल्या एका व्यक्तीकडे दोन हजाराच्या बनावट नोटा असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार बुधवारी (ता. 30) सापळा रचला होता. त्यामध्ये खुद्दुस अडकला. त्याच्याकडून दोन हजाराच्या 349 बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या. त्याची किंमत सहा लाख 98 हजार रुपये आहे. तो मूळचा बंगळूर येथील रहिवासी आहे. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार बंगळूरला छापा टाकून 58 हजारांच्या बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या होत्या. या प्रकरणी आणखी दोन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले होते. 

या खेपेला दहा लाखांच्या नोटा आणल्या होत्या, असे पोलिस चौकशीत सांगितले. त्यासाठी त्याने साडेपाच लाख रुपये दिले होते. दोन हजारांच्या हुबेहुब दिसणाऱ्या या नोटा पाकिस्तानात छापण्यात आल्याचा संशय आहे. त्याचा प्रवास पाकिस्तानमधून बांगलादेश व पश्‍चिम बंगालमधील मालदा येथून भारतात झाल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.