शेतकऱ्यांच्या बंदमुळे एपीएमसीत पोलिस बंदोबस्त 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 जून 2017

कोपरखैरणे - राज्यातील शेतकरी संघटनांनी उद्या (ता. 5) पुकारलेल्या बंदच्या पार्श्‍वभूमीवर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नवी मुंबई पोलिसांनी चोख पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. 

कोपरखैरणे - राज्यातील शेतकरी संघटनांनी उद्या (ता. 5) पुकारलेल्या बंदच्या पार्श्‍वभूमीवर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नवी मुंबई पोलिसांनी चोख पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. 
राज्यातील शेतकऱ्यांनी संप पुकारला आहे. त्यात शेतकरी संघटनांत फूट पडल्याचा आरोप केला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागण्या मान्य केल्याने संप मागे घेतल्याचे काही शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी जाहीर केले होते; परंतु काही नेते संपावर ठाम आहेत. असे असताना काही संघटनांनी सोमवारी "महाराष्ट्र बंद'ची हाक दिली आहे. त्यामुळे वाशीतील कृषी उत्पन्न बाजारपेठेत येणारा माल सुरक्षित कसा येईल व कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. विशेष म्हणजे राज्यातून माल आल्यावर पनवेल येथूनच बहुताश माल वाशी येथे येत असल्याने रस्त्यावर बंदोबस्त ठेवला आहे. आंदोलक गाड्यांची हवा काढून घेणे, चालकांना मारहाण करणे, दूध वा अन्य पदार्थ रस्त्यावर टाकून देणे, असे प्रकार करत असल्याने ते रोखण्याची तयारी पोलिसांनी केली आहे. गरज पडल्यास मुख्यालय आणि राखीव पोलिस बळाच्या तुकड्याचीही मदत घेतली जाणार आहे. पोलिसांबरोबरच दंगलरोधक पथकही तयार ठेवले आहे. 

कोट 
शेतकऱ्यांच्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिलेल्या सूचनेनुसार शहरात चोख बंदोबस्त ठेवला आहे. काही अनुचित घडत असल्याचे दिसताच नागरिकांनी पोलिस ठाणे किंवा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून पोलिसांना मदत करावी. राखीव पोलिस, मुख्यालय अतिरिक्त पोलिस आवश्‍यकतेनुसार यासाठी वापरण्यात येईल. 
- डॉ. सुधाकर पाठारे, पोलिस उपायुक्त परिमंडळ एक.