फास्ट फूड म्हणजे स्लो पॉयझन! 

फास्ट फूड म्हणजे स्लो पॉयझन! 

मुंबई  - वारंवार उकळून गार झालेले तेल, पातेलीत सतत उकळवत ठेवलेला चहा, कमी दर्जाचे रंग, प्रिझर्व्हेटिव्हज्‌ वापरलेले खाद्यपदार्थ, अस्वच्छ ठिकाणी बनवलेले खाद्यपदार्थ यांनी सूक्ष्म प्रमाणात का होईना शरीरात विष जात असते. हे कळणारे तरीही न वळणारे अनेक जण आपल्या सभोवती दिसतात. त्यामुळे असे चमचमीत पदार्थ खाण्याऐवजी फळे सोबत ठेवा, असा सल्ला आहारतज्ज्ञ देतात. 

आजकाल जंक फूड, फास्ट फूड हेच आपले डेली फूड झाले आहे; मात्र असे अन्न कमीत कमी खावे. शक्‍यतोवर घरी बनविलेलेच अन्न खावे. बाहेर असे अन्न खाताना त्यात वारंवार उकळवलेले तेल किंवा खराब रंग वापरले जातात. सतत उकळवत ठेवलेला चहा प्यायला, अस्वच्छ ठिकाणचे अन्न खाल्ले, तर त्यातून सूक्ष्म प्रमाणात आपल्या अंगात विष जाते हे ध्यानात ठेवावे, असे आहारतज्ज्ञ सांगतात. 

फास्ट फूड, जंक फूड घरात महिन्यातून फारतर तीनदा खावे, असे सांगितले जाते; पण हल्लीची तरुण मंडळी रोजच असे अन्न बाहेर खातात. यामुळे होणाऱ्या हानीचे प्रमाणही गणिती पटीत वाढते. प्रिझर्व्हेटिव्ह घातलेल्या कोणत्याही वस्तूचे (ज्यूस, सॉस, जॅम, लोणची, सूप) उदाहरण घ्या. कंपनीने त्यात आपल्या आरोग्याला हानिकारक नसलेल्या प्रमाणात प्रिझर्व्हेटिव्ह घातलेले असतात; पण आपण रोज अशी वेगवेगळी उत्पादने सतत खाल्ली, तर आपल्या शरीरात प्रमाणाबाहेर प्रिझर्व्हेटिव्ह जाणार आणि त्यामुळे आपल्याला अपाय होणार, हे निश्‍चित आहे. नूडल्सचे दुसरे उदाहरण घ्या. त्यातील मैदा म्हणजे आपल्यासाठी एका अर्थाने विषच असते. त्याने आपल्या पोटात कर्बोदके जाऊन आपले रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. इन्स्टंट नूडल्समध्ये मुळातच तेल असते, ही गोष्ट वेगळी. भाज्या बराच काळ कापून ठेवल्या, की त्यातील बी आणि सी जीवनसत्त्वे नष्ट होतात. हल्ली बटरही बनावट वापरले जाते, अशी चर्चा आहे. या धोक्‍यांपासून आपणच सावध राहिले पाहिजे. 

रस्त्यावरच्या गाडीवरून समोसे, भजी, वडे इत्यादी तळलेले पदार्थ घेताना त्यातील तेलाच्या गुणवत्तेवर आपण लक्ष ठेवूच शकत नाही. तीनशे अंश तापमानाला तेल उकळले, की त्याची वाफ होते. सकाळी कढईत पाच लिटर असलेले तेल संध्याकाळी दोन लिटर होते, रात्री ते तेल थंड होते. दुसऱ्या दिवशी गाडीवाला त्यातच आणखी तीन लिटर नवे तेल टाकून घाणा सुरू करतो. एकदा उकळविलेले तेल थंड झाल्यावर पुन्हा उकळवून वापरणे हा धोकादायक प्रकार आहे. त्यातून आपल्या शरीरात ट्रान्स फॅटी ऍसिड; तसेच ऍक्रॉलीन हा विषारी पदार्थ जातो. त्यामुळे डायरिया, उलट्या, नॉशिया येणे, पोटदुखी इत्यादी विकार होऊ शकतात. हा प्रकार केवळ रस्त्यांवरच्या गाड्यांवरच नाही, तर हॉटेलांमध्येही होऊ शकतो, असे आहारतज्ज्ञ रत्नाराजे थार यांनी सांगितले. 

चांगल्या प्रकारचे रंग वापरले नाही, तर ऍलर्जी, गॅस्ट्रो, यकृताच्या समस्येपासून ते सरळ कर्करोगापर्यंत कोणताही आजार होऊ शकतो. आपल्याला गाजराचा रंगही केशरी हवा असतो, भाज्या पिवळ्याधमक लागतात, वाटाणे हिरवेच आवडतात, चायनीज गाडीवर शेजवान खाताना आपल्या हाताला लाल-केशरी रंग सर्रास लागतो. पनीर मखनी-तंदुरी चिकन यांच्यातही लाल रंगाचा भरपूर वापर होतो. हा रंग शरीरात कोठेही जाऊन बसतो. बाहेर खाताना आपण या गोष्टी होईल तेवढ्या टाळाव्यात किंवा जेथे अशा गोष्टी होत नाहीत तेथेच बाहेर खावे, असा सल्लाही थार यांनी दिला. 

रस्त्यावर खाताना... 
स्टॅंडर्ड फूड चेन म्हणजे "मॅकडोनाल्ड', "पिझ्झा हट', "सबवे' अशा मोठ्या फास्ट फूड उत्पादक कंपन्या आपल्या खाद्यपदार्थाने विषबाधा वा भेसळ होणार नाही, याची काटेकोरपणे काळजी घेतात. कारण असे प्रकार होणे त्यांना परवडणारेच नसते; पण रस्त्यावर खाताना काळजी घेतलीच पाहिजे. कारण या गाड्यांना अधिकृत परवाने नसतात. त्यांची तपासणीही होत नाही. या गाडीवर एवढ्या स्वस्तात काय मिळते, सतत उकळवलेला चहा पिणे योग्य आहे का? याचा आपणच विचार केला पाहिजे, असे मुंबई ग्राहक पंचायतीच्या शिक्षण विभागप्रमुख वसुंधरा देवधर यांनी सांगितले. 

गाडीवर 10 रुपयांत मिळणारी चायनीज भेळ किंवा पाच रुपयांत मिळणारे सरबत नेमके काय आहे. आपण हे काय पोटात ढकलत आहोत, याचा ग्राहकांनी विचार केला पाहिजे. चहा सतत उकळवत, शिजवत ठेवता कामा नये. उकळी आली की तो बंद केला पाहिजे. गाडीवरचा सतत उकळणारा चहा लगेच विषबाधा करत नाही; पण तो आपले सूक्ष्म नुकसान करीत असतो. तसे केल्याने त्यातील ऍण्टी ऑक्‍सिडंट निघून जातात आणि इतर अपायकारक पदार्थ त्यामध्ये येतात. स्वच्छतेचे नियम पाळलेच पाहिजेत. गटाराच्या कडेवरच्या गाडीवरचे पदार्थ खाऊ नका, अस्वच्छ ठिकाणी जेवू नका, 10 रुपयांची चायनीज भेळ खाण्यापेक्षा तेवढ्याच पैशांत दोन-तीन केळी खा, असेही देवधर म्हणाल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com