गॅंगस्टर डी. के. रावला खंडणीप्रकरणी अटक 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017

मुंबई - कुख्यात गॅंगस्टर छोटा राजन याचा हस्तक डी. के. राव याला खंडणीप्रकरणी गुन्हे गुप्तवार्ता विभागाने बुधवारी (ता. 11) अटक केली. धारावीतील एसआरए प्रकल्पाशी संबंधित असलेल्या तक्रारदाराला रावने धमकावत त्याच्या साथीदाराला 50 लाख रुपये देण्यास सांगितल्याचा त्याच्यावर आरोप आहे. 

मुंबई - कुख्यात गॅंगस्टर छोटा राजन याचा हस्तक डी. के. राव याला खंडणीप्रकरणी गुन्हे गुप्तवार्ता विभागाने बुधवारी (ता. 11) अटक केली. धारावीतील एसआरए प्रकल्पाशी संबंधित असलेल्या तक्रारदाराला रावने धमकावत त्याच्या साथीदाराला 50 लाख रुपये देण्यास सांगितल्याचा त्याच्यावर आरोप आहे. 

धारावीत एसआरएअंतर्गत पुनर्विकास सुरू झाला आहे. या ठिकाणी एक हजार रहिवासी असलेली मोठी सोसायटी असून, या सोसायाटीचे पुनर्विकासाचे कंत्राट एका बांधकाम व्यावसायिकाला मिळाले होते; मात्र यातील काही रहिवाशांचा विरोध होता. त्यांना तयार करण्याची जबाबदारी यातील एका मध्यास्थाला बांधकाम व्यावसायिकाने दिली होती. त्यानुसार या व्यक्तीने सोसायटीचे प्रमोटर आणि रहिवासी यांच्यात मध्यस्थी केली. तसेच एसआरए संबंधित सर्व कार्यवाही पूर्ण केली. त्यासाठी तक्रारदाराला दोन फ्लॅट व दोन कोटी रुपये मिळणार होते; मात्र ते न देता या प्रोजेक्‍टमधून बाहेर पडण्यासाठी आणि त्याच्या एका साथीदाराला 50 लाख रुपये देण्यासाठीही धमकी देऊ लागला. तीन वर्षे अशा प्रकारची धमकी वारंवार येऊ लागल्याने अखेर तक्रारदाराने बुधवारी याप्रकरणी धारावी पोलिस ठाण्यात तक्रार केली. धारावी पोलिसांनी हे प्रकरण गुप्तवार्ता विभागाकडे वर्ग केले. त्यानुसार करारवाई करत गुप्तवार्ता विभागाने रावला अटक केली. 

अटकेच्या दोन दिवस आधी छोटा राजनने केला फोन 
सप्टेंबर 2015 मध्ये रावने त्याच्या हस्तक हारूनमार्फत दूरध्वनी करून तक्रारदाराचे छोटा राजनशी बोलणे करून दिले. त्याने याप्रकरणी दोन बांधकाम व्यावसायिकांमध्ये मध्यस्थी करण्यास सांगितले. तसेच आता गणपती असल्यामुळे त्यानंतर याबाबत बोलू, असे तक्रारदाराला सांगितले, पण त्याच्या दोन दिवसांनंतरच राजनला अटक झाली. 

रुग्णालयात पहिल्यांदा धमकावले? 
रवी मल्लेश ऊर्फ डी. के. रावला 2011 मध्ये वरिष्ठ पत्रकार जे. डे हत्या आणि जे. जे. गोळीबारप्रकरणी अटक झाली होती. तक्रारदाराने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार फेब्रुवारी 2014 मध्ये त्याची पहिल्यांदा भेट सेंट जॉर्ज रुग्णालयात झाली. त्या वेळी पोलिस बंदोबस्तात त्याला कारागृहातून तेथे आणण्यात आले होते. त्या वेळी धमकावल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पोलिस याची पडताळणी करत आहेत.