घरकुल योजनेसह आरक्षणासाठी कटिबद्ध - फडणवीस

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 सप्टेंबर 2017

नवी मुंबई - माथाडी कामगारांचे नेते अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त "एपीएमसी' मार्केटमध्ये आयोजित मेळाव्याला अनुपस्थित राहिल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोबाईलवरून माथाडी कामगारांसाठी संदेश प्रसारित केला आहे. त्याचबरोबर अनुपस्थितीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. भविष्यात राज्य सरकार माथाडी कामगारांच्या घरांच्या प्रश्‍नासह मुलांचे शिक्षण व मराठा आरक्षणासाठी कटिबद्ध असल्याचे आश्‍वासनही दिले आहे.

या मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शरद पवार यांच्या राजकीय कारकिर्दीला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर सत्कार समारंभाचे आयोजन केले होते. "या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी दांडी मारल्यामुळे माझा पोपट झाला,' अशी कबुली आमदार नरेंद्र पाटील यांनी जाहीरपणे भाषणात दिली होती. आता मुख्यमंत्र्यांनी मोबाईलवरून माथाडी कामगारांसाठी एक विशेष संदेश प्रसारित करून पाटील यांच्या पाठीशी उभे राहिलो असल्याचे सूचित केले आहे.

विडी कामगारांच्या धर्तीवर माथाडींना घरे
सोलापूर येथील विडी कामगारांसाठी उभारलेल्या घरांच्या धर्तीवर पुणे, नाशिक, औरंगाबाद, नवी मुंबईतील माथाडी कामगारांसाठी पंतप्रधान आवास योजनेतून घरे उभारण्यात येणार आहेत, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.