19 वर्षांनंतर तिला मिळालं नाक...

कोमल डहाळे
कोमल डहाळे

शेकडो वर्ष जुनी पद्धती वापरुन डॉक्टरांनी केली शस्त्रक्रिया

मुंबई : जन्मतःच तिचं नाक चपटं होतं. ते नाक बरं होईल असा विश्वास तिला अनेक डॉक्टरांनी दिला. त्यासाठी दोन शस्त्रक्रियाही झाल्या. मात्र, तिला नाक मिळांल ते गोकूळदास तेजपाल (जी.टी.) रुग्णालयातील डॉक्टरांमुळे. युद्धातील जखमींवर वापरायची शेकडो वर्ष जुनी शस्त्रक्रिया त्यासाठी डॉक्टरांनी वापरली.

माझं नाक चपटं होतं. जन्मतःच ते तसं असल्याने आसपासच्या लोकांना त्याची सवय होती. पण मला वाटतं होतं माझं नाक व्यवस्थित होईल का? तीन वर्षांपासून बऱ्याच डॉक्टरांकडे दाखवलं. शस्त्रक्रिया झाल्यामुळे त्रास झाला. पैसे गेले पण नाक काही व्यवस्थित झालेलं नाही. शेवटी इथे आले अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डी गावाहून जी.टी. रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी दाखल असलेली कोमल डहाळे (19 वर्षे) सांगते. ऑगस्ट महिन्यापासून कोमल मुंबईच्या जी.टी रुग्णालयाच्या प्लास्टिक सर्जरी विभागात उपचार घेत आहे. तिच्यावर टॅगलियाकोझी ही इटालियन शास्त्रज्ञाने शेकडो वर्ष पुर्वी केली शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. रुग्णालयाच्या प्लास्टिक सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. नितीन मोकल यांनी सांगितले, त्यानुसार अत्यंत जुनी पद्धती असून सध्या वापरात नाही. मात्र, काही डॉक्टरांकडून तिच्यावर शस्त्रक्रिया झाली ज्याने सध्या वापरात असलेल्या पद्धती वापरुन तिच्यावर शस्त्रक्रिया करणं योग्य नव्हतं. म्हणून टॅगलियाकोझी या पद्धतीचा वापर करण्याचा निर्णय घेतला.

खरंतर नाक तयार करण्यासाठी कपाळाच्या वरच्या भागात हवा सोडून तिथे फुग्यासारखा भाग करण्यात येतो. तो खाली आणून नाकाकडे जोडण्यात येतो. त्यानंतर काही दिवसांनंतर ते नाक वेगळं करण्यात येतं. मात्र, याआधी कोमलवर ही शस्त्रक्रिया झाली होती आणि ती फसली होती. तेव्हा तो पर्याय वापरता येणार नव्हता. म्हणून टॅगलियाकॉझी पद्धतीचा वापर करण्याचा निर्णय घेतल्याचे डॉ. मोकलं यांनी सांगितले.

अजूनही कोमलचे नाक पूर्ण तयार झालेले नाही. हाताची चामडी ही नाकाच्या चामडीपेक्षा जाड असते. तेव्हा सध्या नाकासारखा आकार तयार झाला आहे. त्याच्या जखमा भरल्या टाके निघाले की मग कोमलच्या नाकावर असलेली अतिरिक्त चरबी काढून त्याला तिच्या चेहऱ्याला शोभेल असा आकार देण्यात येईल. त्यानंतर तिचं नाक तयार होईल, अशी माहिती प्लास्टिक सर्जरी विभागातील डॉ. सागर गुंडेवार यांनी सांगितले.  

तीन आठवडे नाकाला तिचा हात जोडला होता, तेव्हा त्रास तर झाला. पण काहीतरी मिळवायला थोडा त्रास तर होणारच ना? असं कोमल समजुतीच्या स्वरात सांगते. कोमलची आई हेमलता डहाळे हिला मुलीचं चपटं नाक जाऊन चांगलं नाक मिळालं तर तुम्हाला काय वाटतं असं म्हटल्यावर ती फक्त हसून आपला आनंद व्यक्त करते.  

डॉ. सागर गुंडेवा यांनी दिलेल्या माहितीनुसार, रायनोप्लास्टीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून रुग्ण येतात. त्यात महिला मोठ्या प्रमाणावर असतात. लग्नाचं वय जवळ आलं की मग डॉक्टरांसाठी शोधाशोध सुरू होते. डॉ. मोकल यांनी दिलेल्या माहितीनुसार अनेकदा जी.टी. रुग्णालयात येणारे रुग्ण हे स्थानिक डॉक्टरांकडून उपचार किंवा शस्त्रक्रिया करुन हवा तसा रिझल्ट न मिळाल्याने येतात. तेव्हा त्यात सुधारणा करण्यासाठी आम्ही काम करतो. रुग्णांना स्वस्तात चांगले उपचार सरकारी रुग्णालयात मिळतात हे माहित नसतं अशी खंतही डॉ. मोकल व्यक्त करतात.  

काय असते ही शस्त्रक्रिया
यामध्ये हाताची चामडी वापरुन नाक तयार करण्यात येतं. त्यासाठी दंडाचा काही भाग शस्त्रक्रिया करुन वेगळा करण्यात येतो. त्यानंतर त्यातील रक्तपुरवठा करणाऱ्या नसेचा रक्तप्रवाह हळू हळू कमी करण्यात येतो. मग हा वेगळा केलेला भाग नाकाला जोडण्यात येतो. तीन आठवडे दंड आणि नाक जोडलेल्या अवस्थेत राहतं. तीन आठवड्यांनंतर ते वेगळं करण्यात येतं. रायनोप्लास्टी या प्लास्टिक सर्जरीअंतर्गत मोडणाऱ्या सर्वात जुन्या शस्त्रक्रियेपैकी ही शस्त्रक्रिया आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com