आरक्षित तिकीट रद्द केल्यास भुर्दंड

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 मे 2017

एसटीचा निर्णय; चार तासांपर्यंत 50 टक्‍के परतावा

एसटीचा निर्णय; चार तासांपर्यंत 50 टक्‍के परतावा
मुंबई - प्रवाशांसह उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न केले जात असतानाच दुसरीकडे एसटी महामंडळाने प्रवाशांच्याच खिशाला कात्री लावण्याचा निर्णय घेतला आहे. आरक्षित तिकीट रद्द करणे आता प्रवाशांना महागात पडणार आहे. बस सुटण्याच्या चार तास आधी तिकीट रद्द केल्यास प्रवाशांना 50 टक्‍के रक्कम परत केली जाणार आहे. परताव्याच्या दरात इतरही बदल महामंडळाने केले आहेत. या संदर्भात 29 मे रोजी आदेशही काढण्यात आले.

यापूर्वी गाडी सुटण्याच्या नियोजित वेळेच्या चार तास आधी आरक्षित तिकीट रद्द केल्यास अवघ्या पाच रुपयांची कपात करून प्रवास भाड्याची उर्वरित रक्‍कम संबंधित प्रवाशास परत केली जात होती. मात्र, आता 50 टक्‍के रक्कम कपात केली जाणार आहे. बस सुटण्याच्या अर्धा तासापर्यंत तिकीट रद्द केल्यास 10 टक्‍के कपात केली जात होती. नव्या बदलानुसार 12 तासांपर्यंत तिकीट रद्द केल्यास 25 टक्‍के रक्कम कपात केली जाणार आहे. त्यामुळे आरक्षित तिकीट रद्द करताना प्रवाशांच्या खिशाला मोठी कात्री लागणार आहे.

24 तासांपर्यंत 10 टक्‍के कपात
बस सुटण्याच्या 30 मिनिटांपूर्वी आणि प्रत्यक्षात बस सुटल्यानंतर दोन तासांपर्यंत आरक्षित तिकीट रद्द केल्यास 50 टक्‍के रक्कम परत केली जात होती. यापुढे 24 तासांपर्यंत तिकीट रद्द केल्यास परतव्याच्या रकमेतून 10 टक्‍के कपात केली जाणार आहे.

टॅग्स