राज्यातील 82 टक्के शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार - मुख्यमंत्री

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 10 जुलै 2017

मुंबई - "छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने'च्या माध्यमातून 34 हजार कोटींची ऐतिहासिक कर्जमाफी कुठलीही अट न ठेवता सरसकट करण्यात आली आहे. यामुळे दीड लाख रुपयांपर्यंत थकीत कर्ज शेतकऱ्यांपैकी जवळपास 82 टक्के शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

पीककर्जासोबतच शेती संलग्नपुनर्गठित कर्जाचा देखील या योजनेत समावेश आहे. राज्य शासनाने वास्तवाच्या आधारावर कर्जमाफीचे गणित केले आहे आणि ते बरोबर आहे. खऱ्या शेतकऱ्यांनाच लाभ मिळावा, यासाठी कर्जमाफी देताना शेतकऱ्याचा आधार क्रमांक बॅंक खात्याशी संलग्न करून खात्यांची पडताळणी करण्यात येईल. कर्जमाफी हा अंतिम उपाय नाही. शेतकऱ्याला सुखी करण्यासाठी शेतीत गुंतवणूक वाढवून हे क्षेत्र शाश्वत करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित "मुख्यमंत्री बोलतोय' या कार्यक्रमात शेतकरी कर्जमाफी योजनेविषयी संवाद साधताना मुख्यमंत्री बोलत होते. दूरचित्रवाणीवरील विविध वाहिन्यांवर आज या कार्यक्रमाच्या पहिल्या भागाचे प्रसारण करण्यात आले. राज्यभरातून 20 हजार जणांनी मोबाईल संदेश, ई-मेलच्या माध्यमातून या संदर्भात प्रश्न विचारले. त्यातील निवडक प्रातिनिधिक प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनी उत्तरे दिली.