माथाडी कामगारांच्या घरांचा दोन महिन्यांत निर्णय - मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 सप्टेंबर 2017

मुंबई - वडाळा आणि चेंबूर येथील माथाडी कामगारांच्या घरकुलांसंदर्भात येत्या दोन महिन्यांत सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माथाडी कामगारांच्या शिष्टमंडळाला दिले. 

मुंबई - वडाळा आणि चेंबूर येथील माथाडी कामगारांच्या घरकुलांसंदर्भात येत्या दोन महिन्यांत सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माथाडी कामगारांच्या शिष्टमंडळाला दिले. 

सह्याद्री राज्य अतिथीगृहात माथाडी कामगारांच्या विविध मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. या वेळी ते म्हणाले, की चेंबूर आणि वडाळा येथील माथाडी कामगारांच्या गृहनिर्माण संस्थेला चटई क्षेत्र वाढवून देण्याबरोबरच वाढीव चटई क्षेत्राच्या रकमेत सवलत देण्याबाबत निश्‍चित विचार केला जाईल. गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांची यादी करताना, माथाडी कामगारच असेल याची दक्षता घ्यावी. अन्य कोणी इतर संस्थेचा कर्मचारी, कामगार नसावा. 

माथाडी बोर्डात कामगारांच्या मुलांना नोकऱ्या देण्याबाबत कामगारमंत्र्यांशी बोलून निर्णय घेऊ, असेही आश्‍वासन त्यांनी दिले. या बैठकीत माथाडी कामगार संघटनेतर्फे शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री निधीला 25 लाखांचा धनादेश मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला. या वेळी आमदार नरेंद्र पाटील, शशिकांत शिंदे, माजी आमदार विजय सावंत, गुलाबराव जगताप, पोपटराव देशमुख आदी उपस्थित होते.