आमदार कदमांची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

मुंबई - गैरव्यवहारांच्या आरोपांवरून अटकेत असलेले आमदार रमेश कदम यांची पावसाळी अधिवेशनात हजेरी लावण्याची मागणी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली.

मुंबई - गैरव्यवहारांच्या आरोपांवरून अटकेत असलेले आमदार रमेश कदम यांची पावसाळी अधिवेशनात हजेरी लावण्याची मागणी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली.

भायखळा तुरुंगात पोलिसांच्या मारहाणीत कैदी मंजुळा शेट्ये हिचा मृत्यू झाला. त्यासंदर्भात महत्त्वाचे खुलासे विधिमंडळ अधिवेशनात करणार असल्याने अधिवेशनात हजेरी लावण्याची परवानगी मिळावी, अशी याचिका कदम यांच्या वतीने ऍड. राजीव चव्हाण यांनी केली होती. न्या. रणजीत मोरे आणि न्या. अजय गडकरी यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर सुनावणी झाली.

कदम यांच्यावर गंभीर आरोप असल्यामुळे त्यांना पावसाळी अधिवेशनात हजेरी लावण्याची परवानगी देता येणार नाही, असे खंडपीठाने या वेळी स्पष्ट केले. तसेच, मंजुळाच्या मृत्युबाबतची महत्त्वाची माहिती कदम संबंधित तपास अधिकाऱ्यांना देऊ शकतात. त्याकरिता अधिवेशनात जाण्याची आवश्‍यकता नाही, असेही खंडपीठ म्हणाले. न्यायालय याबाबत सविस्तर निकालपत्र लवकरच देणार आहे.