मुस्तफा डोसा याचा जे. जे. रुग्णालयात मृत्यू 

मुस्तफा डोसा याचा जे. जे. रुग्णालयात मृत्यू 

मुंबई - मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी मुस्तफा डोसा याचा बुधवारी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू असताना हृदयविकाराच्या झटक्‍याने मृत्यू झाला. पहाटे 3 च्या सुमारास त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

छातीत दुखत असल्याची तसेच 102 डिग्री ताप असल्याच्या तक्रारीवरून त्याला रुग्णालयातील जेल कक्षात ठेवले होते. मुस्तफाला उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचाही त्रास होता. छातीत संसर्ग झाल्याने त्याच्यावर सलग तीन तास उपचार सुरू होते, असे जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले. 

1993च्या बॉम्बस्फोट खटला मालिकेच्या दुसऱ्या टप्प्यात विशेष टाडा न्यायालयाने दोषी ठरवलेल्या आरोपी मुस्तफा डोसा आणि फिरोज खान यांनी स्फोटाच्या कटात मुख्य भूमिका बजावली आहे. किंबहुना याप्रकरणी फासावर लटकवण्यात आलेल्या आरोपी याकूब मेमन याच्यापेक्षाही गंभीर गुन्हा मुस्तफा डोसासह फिरोजने केला असून, त्याला या कृत्याचा जराही पश्‍चात्ताप नसल्याने कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी सीबीआयच्या वकिलाने विशेष टाडा न्यायालयात केली होती. 

दाऊदचा महत्त्वाचा हस्तक 
दाऊद टोळीचा महत्त्वाचा हस्तक अशी मुस्तफा डोसाची ओळख होती. मुंबई बॉम्बस्फोटाच्या कटात कुख्यात गुंड डॉन दाऊद इब्राहिम, मोठा भाऊ मोहम्मद डोसा आणि टायगर मेमन यांच्यासह मुस्तफादेखील प्रमुख सूत्रधार होता. दुबईत राहून या बॉम्बस्फोटांचा कट आखणाऱ्या मुस्तफाला 2000 मध्ये इंटरपोलच्या सततच्या मागणीमुळे दुबई पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्याला भारतीय तपास यंत्रणांच्या ताब्यात देण्यात आले होते. 20 मार्च 2003 रोजी दिल्ली येथे मुस्तफा डोसाला 1993 च्या जातीय दंगली आणि मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी अटक करण्यात आली होती. डोसासह अबू सालेम व अन्य एकूण सात जणांवर मुंबईतील बॉम्बस्फोटप्रकरणी खटला सुरू होता. 

स्फोटांसाठी माणसे जाळ्यात ओढली 
अयोध्येतील वादग्रस्त बांधकाम पाडण्यात आल्यानंतर उसळलेल्या जातीय दंगलींमध्ये मुस्लिमांवरील तथाकथित अत्याचारांचा सूड उगवण्यासाठी मुंबईतील गुन्हेगारी टोळ्यांच्या प्रमुखांची दुबईत आपल्या घरी पहिली बैठक घेणाऱ्या मोहम्मद अहमदचा धाकटा भाऊ मुस्तफा अहमद डोसा याने बैठकीत बॉम्बस्फोटांसाठी आरडीएक्‍स, शस्त्रसाठा व दारूगोळा मुंबईत पोहचवण्याची मुख्य जबाबदारी मुस्तफा डोसावर होती. डोसा या कटातील मुख्य सूत्रधारांपैकी एक होता. स्फोटांसाठी माणसे जाळ्यात ओढण्याची जबाबदारीही त्याच्यावर होती. मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडवण्यासाठी चार टोळ्या नेमण्यात आल्या होत्या. त्यातील एका टोळीचा प्रमुख मुस्तफा डोसा होता. 

दाऊदच्या घरातील बैठकांना हजर 
शस्त्रास्त्रे, डिटोनेटर, दारूगोळा, हातबॉम्ब, एके-56, हातबॉम्ब तसेच आरडीएक्‍ससारख्या शक्तिशाली स्फोटकांची भारतात तस्करी करणे आणि शस्त्रास्त्रे चालवण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी डोसाने टायगर मेमन आणि छोटा शकीलसह भारत तसेच पाकिस्तानात शिबिरे घेतली होती. त्यांनी शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देण्यासाठी काही जणांना भारतातून दुबईमार्गे पाकिस्तानात पाठवले होते. कटासंदर्भात दुबईत "व्हाईट हाऊस' या दाऊद इब्राहिमच्या घरातील अनेक बैठकांना मुस्तफा डोसा हजर असल्याचा आरोप त्याच्यावर होता. याशिवाय पनवेलमधील बैठकांनाही तो उपस्थित होता. कट रचण्यासाठी डिसेंबर 1992 मध्ये दुबईतील "डोसा ब्रदर्स' या इमारतीत बैठक झाली होती. तिथेच दिघी बंदरात शस्त्रसाठा पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार एके 47, एके 56 रायफली आणि स्फोटकांचा पहिला साठा रायगडजवळच्या दिघी बंदरात पाठवण्यात आला. पाकिस्तानात प्रशिक्षणासाठी पाठवलेल्या माणसांचा दुबईतील राहण्याचा खर्च डोसाने केला होता. स्फोटांनंतर उरलेली स्फोटके व शस्त्रास्त्रे त्यानेच नष्ट केली होती. डोसा याला सलीम शेख ऊर्फ सलीम कुत्ताने 1995मध्ये दिलेल्या जबाबावरून या स्फोटांप्रकरणी आरोपी करण्यात आले. विशेष टाडा न्यायालयाने 16 जूनला डोसासह एकूण सहा जणांना या बॉम्बस्फोटांप्रकरणी दोषी ठरवले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com