राणेंच्या 'स्वाभिमानी'मुळे घटक पक्ष बिथरले

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 3 ऑक्टोबर 2017

मुंबई - कॉंग्रेसमधून बाहेर पडलेल्या माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाची घोषणा केली. राणे आपल्या पक्षासह भाजपमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए) घटक पक्ष म्हणून लवकरच सामील होणार असून, त्यांचा राज्याच्या मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याचे सांगितले जाते. या राजकीय घडामोडींमुळे भाजपचे राज्यातील घटक पक्ष चांगलेच बिथरले आहेत. राणे यांच्या संभाव्य समावेशामुळे "कानामागून आली आणि तिखट झाली' अशी या घटक पक्षांची भावना झाली आहे.

शिवसेनेबरोबरची युती संपुष्टात आल्यानंतर भाजपबरोबर राष्ट्रीय समाज पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसंग्राम पक्ष आणि भारतीय रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) हे पक्ष सोबत गेले. यात सध्या राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर कॅबिनेट, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत हे राज्यमंत्री, रिपब्लिकन नेते रामदास आठवले केंद्रात राज्यमंत्री आहेत, तर शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांना अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांच्या स्मारकाची जबादारी दिली आहे. या घटक पक्षांपैकी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भाजपचा पाठिंबा काढला असून, सदाभाऊ खोत यांची हकालपट्टी केली आहे. खोत यांनी स्वतंत्र संघटना स्थापन केली आहे. या घटक पक्षाची बरोबरी काही दिवसांत राणे करणार आहेत. भाजपमध्ये आपल्यापेक्षा राणे यांना अधिक महत्त्व दिले जाईल. प्रसंगी आपल्याकडे दुर्लक्ष तर होणार नाही ना, या भीतीने घटक पक्षांच्या नेत्यांना ग्रासले आहे. शिवाय राणे यांनी स्वतंत्र पक्ष काढल्यामुळे घटक पक्षांतील नाराज कार्यकर्ते, पदाधिकारी यांना राणे यांनी गळाला लावले, तर त्याचा परिणाम पक्षाच्या ताकदीवर होईल, ही दुसरी भीती या पक्षांना सतावत आहे.

Web Title: mumbai news politics