प्रदूषणाच्या समस्येवर फेरवापर हाच उपाय

प्रदूषणाच्या समस्येवर फेरवापर हाच उपाय

मुंबई - जागतिक तापमानवाढीचे आव्हान संपूर्ण जगासमोर उभे आहे. झपाट्याने होणारे शहरीकरण आणि तंत्रज्ञानाच्या वापराने जीवन सुसह्य झाले असले, तरी भविष्यात त्याचे पर्यावरणावर दूरगामी परिणाम होण्याची शक्‍यता आहे. मनुष्याप्रमाणेच नैसर्गिक साधन-संपती, वन्यजीव, जलचर आदींना प्रदूषणाचा सामना करावा लागणार आहे. प्रदूषणाला आळा घालण्यासाठी टाकाऊतून टिकाऊची आणि पुनर्निर्मिती-फेरवापराची संकल्पना अंगीकारावी लागणार आहे.

फेरप्रक्रिया आणि फेरवापरात अनेक संधी आहेत. बड्या उद्योगांनी या क्षेत्रात प्रवेश केल्यास ते क्षेत्र अधिक विस्तारेल. पाश्‍चिमात्य देशांप्रमाणे शाश्‍वत विकासाच्या धर्तीवर फेरप्रक्रिया करण्यासाठी मोठ्या प्रमाणात संशोधन आणि विकासाला चालना द्यावी लागणार आहे. यासाठी सरकारकडून आणि खासगी क्षेत्रातून गुंतवणूक झाली पाहिजे. पोलादाचा पुनर्वापर करण्यासाठी पोलाद फेरप्रक्रिया प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय सरकारने नुकताच घेतला. २०३० पर्यंत ३०० दशलक्ष टन पोलाद उत्पादनाचे लक्ष्य पूर्ण करण्यात पोलादाचा फेरवापर महत्त्वाचा ठरणार आहे. धातूवर फेरप्रक्रिया हा झपाट्याने वाढणारा उद्योग आहे. सध्या त्यात २० ते २५ टक्‍क्‍यांनी वाढ होत असून, २०२० पर्यंत फेरवापरातील पोलादाचे उत्पादन ४३ दशलक्ष टनांपर्यंत वाढेल; मात्र याच कालावधीत ५३ दशलक्ष टनांची पोलादाची मागणी असेल. ही तफावत भरून काढण्यासाठी दहा दशलक्ष टन फेरवापर केलेले पोलाद आयात करावे लागणार आहे. कालबाह्य झालेल्या वाहनांचे भंगार आणि नव्या वाहनांची पोलादाची वाढती मागणी यामुळे वाहन उद्योगातच पोलाद, ॲल्युमिनियम फेरप्रक्रियेसाठी प्रचंड संधी आहेत; मात्र पोलादात स्वयंपूर्ण बनण्यासाठी फेरप्रक्रिया आणि फेरवापरासाठी पोषक पायाभूत सेवासुविधांचा विकास होणे  आवश्‍यक आहे.

कचरा वेचक आणि स्वयंसेवी संस्थांशी जोडून कचऱ्यावर फेरप्रक्रिया करण्यासाठी ‘टेट्रापॅक’ कंपनी काम करते. ‘टेट्रापॅक’चे देशभरात चार प्रकल्प असून, दररोज ४०० टन ‘टेट्रापॅक’वर फेरप्रक्रिया केली जाते. दरवर्षी भारतात आठ अब्ज ‘टेट्रापॅक’ची विक्री होते. टेट्रापॅकवर फेरप्रक्रिया करून त्यातून पॉलिथिन आणि ॲल्युमिनियमच्या रूफशीट्‌स, कार्डबोर्ड तयार केले जातात. कचरा फेरप्रक्रिया आणि फेरवापराबाबत कंपनीने ‘गो ग्रीन’, ‘प्रोजेक्‍ट सर्च’, लष्कराशी सहकार्य करार केला असून, कचरा वेचणाऱ्यांसाठी सामाजिक उपक्रमही हाती घेतला आहे.
- जयदीप गोखले, संचालक, टेट्रापॅक, दक्षिण आशिया

कागदनिर्मितीसाठी प्रक्रिया केलेला माल देशांतर्गत मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे; मात्र दुर्दैवाने त्याचा वापर होत नाही. पर्यावरणाला हानी पोचू नये, यासाठी यश पेपर्सने खाद्यपदार्थांच्या पॅकेजिंगसाठी संपूर्ण विघटन होणारा कागद तयार केला आहे. या कागदातून सात विविध प्रकारच्या पॅकेजिंगच्या वस्तू तयार होतात. उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे कंपनीचा प्रकल्प असून, सध्या तेथे दररोज १० लाख कागदी डिशेस आणि इतर वस्तू तयार होतात.
- वेद क्रिष्णा, नियोजनप्रमुख, यश पेपर्स
 

ई-कचरा
नुकताच केंद्र सरकारने ई-कचरा व्यवस्थापन कायदा २०१६ मध्ये सुधारणा केली. ई-कचऱ्याचे सुरक्षित विघटन करण्यासाठी उत्पादकांना पहिल्या वर्षी किमान दहा टक्के ई-कचऱ्याचे विघटन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यापूर्वी हे प्रमाण ३० टक्के होते. एका अभ्यासानुसार, चीनमध्ये ६.२ दशलक्ष टन, जपानमध्ये २.२ आणि भारतात दरवर्षी १.७ दशलक्ष टन ई-कचरा निर्माण होतो. यातील केवळ १.५ टक्के ई-कचऱ्यावर फेरप्रक्रिया होते. 

फेरप्रक्रियेतून कागदनिर्मिती
देशात जवळपास ५० टक्के कागदाची निर्मिती लाकूड आणि इतर घटकांपासून होते. त्याचबरोबर ५० टक्के कच्चा माल आयात करावा लागतो. देशभरात कागदनिर्मिती करणारे ८०० कारखाने आहेत. फेरप्रक्रियेतून कागद तयार करता येऊ शकतो. विघटन होणाऱ्या वस्तूंच्या वापराबाबत समाजात जनजागृती करण्यासाठी शाळांमध्ये अभियान चालवणे आवश्‍यक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com