चौकशीला सामोरे जाण्याची तयारी - महेता

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

मुंबई - ताडदेव येथील एमपी मिल कंपाउंड झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाची (एसआरए) चौकशी करण्याची घोषणा सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. "आपण या प्रकरणात निर्दोष असून, कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्याची आपली तयारी आहे,' असे गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता यांनी जाहीर केले. विरोधी पक्षांसोबत बैठक घेऊन महेता यांची चौकशी कशाप्रकारे केली जाईल, या संदर्भात निर्णय घेण्यात येईल, असेही मुख्यमंत्री या वेळी म्हणाले.

एमपी मिल कंपाउंड "एसआरए' प्रकल्पावरून कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जयंत पाटील यांनी महेता यांना लक्ष्य केले होते. विकसकाच्या फायद्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची परवानगी नसतानाही महेता यांनी संबंधित फाईलवर "आपण मुख्यमंत्र्यांना अवगत केले आहे', असा शेरा मारल्याने विकसकाला सुमारे 700 कोटींचा फायदा होणार, असा आरोप चव्हाण आणि पाटील यांनी केला.

चूक सुधारली - महेता
"एसआरए'प्रकरणी मी निर्दोष असून, कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी मी काही प्रकल्पांबाबत चर्चा केली. त्या वेळी या प्रकल्पाची फाईल चर्चेसाठी नव्हती. मात्र, ती होती असे समजून चुकून त्यावर मी "मुख्यमंत्र्यांना अवगत केले' असा शेरा मारला. मात्र, अधिकाऱ्यांनी लक्षात आणून दिल्यानंतर चूक सुधारण्यात आली, असे या वेळी प्रकाश महेता यांनी स्पष्ट केले.

सभागृहातील घडामोडी...
- मुख्यमंत्र्यांच्या उत्तरानंतरही विरोधकांचा सभात्याग
- विश्‍वास पाटील यांची चौकशी
- "एसआरए' प्रकल्पाच्या नोंदी यापुढे डिजिटल

Web Title: mumbai news Preparation to face inquiry