सह्याद्री अतिथिगृहाचा पाककृतीसाठी वापर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 ऑगस्ट 2017

राज्याच्या मुख्य सचिवांच्या पत्नीकडून गैरवापर

मुंबई: राज्य सरकारच्या सह्याद्री राज्य अतिथिगृहाचा वापर आणि बैठकांबाबत स्पष्ट निर्देश शासन परिपत्रकात असताना त्याचा गैरवापर राज्याचे मुख्य सचिव सुमित मलिक यांच्या पत्नी तनुजा मलिक यांनी केल्याची बाब माहिती अधिकारातून उघडकीस आली आहे.

राज्याच्या मुख्य सचिवांच्या पत्नीकडून गैरवापर

मुंबई: राज्य सरकारच्या सह्याद्री राज्य अतिथिगृहाचा वापर आणि बैठकांबाबत स्पष्ट निर्देश शासन परिपत्रकात असताना त्याचा गैरवापर राज्याचे मुख्य सचिव सुमित मलिक यांच्या पत्नी तनुजा मलिक यांनी केल्याची बाब माहिती अधिकारातून उघडकीस आली आहे.

तनुजा मलिक अध्यक्ष असलेल्या आयएएस विव्हज असोसिएशनने पाककृती स्पर्धा चक्क सह्याद्री राज्य अतिथिगृहात आयोजित केल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी म्हटले आहे. सामान्य प्रशासनाच्या राजशिष्टाचार विभागाने गलगली यांना सह्याद्री अतिथिगृहाच्या गेल्या सहा महिन्यांत झालेल्या आरक्षणाची माहिती दिली. 1 मार्च 2017 पासून 17 जुलै 2017 या कालावधीत एकूण 139 वेळा आरक्षण झाले आणि त्यातून सरकारला 28 लाख 83 हजार 197 रुपये रक्कम भाड्याच्या रूपाने मिळाली. गेल्या सहा महिन्यांत आयएएस ऑफिसर्स विव्हज असोसिएशनने चार वेळा आरक्षण केले. त्यांना सहा हजार 150 रुपये इतके भाडे आकारले गेले. 8 जुलै 2017 रोजी पाककृती स्पर्धेसाठी "सह्याद्री'चा वापर केला गेला. या व्यतिरिक्त 18 एप्रिल आणि 20 मे 2017 रोजीसुद्धा अतिथिगृहाचा वापर नियमांचे उल्लंघन करत केला गेला. भाजपचे आमदार राज पुरोहित यांनीसुद्धा 14 जून 2017 रोजी सह्याद्री अतिथिगृहाचा वापर केला होता. सहसचिव लता नंद कुमार यांनी 22 जून 2017 रोजी आरक्षण करताना कार्यक्रमाचा उल्लेख केला नसतानाही उपसचिव भोगे यांनी कक्ष उपलब्ध करून देण्याचा आदेश दूरध्वनीवरून दिल्याचे नमूद करण्यात आले आहे.

सह्याद्री राज्य अतिथिगृहात फक्त मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, राज्यमंत्री, मुख्य सचिव, अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव वा त्या दर्जाच्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठका/ कार्यशाळा/ पत्रकार परिषदा आयोजित करण्यात याव्यात, असा आदेश 24 जुलै 2015 च्या शासन परिपत्रकानुसार नियम 4 अ प्रमाणे जारी करण्यात आला असतानाही सनदी अधिकाऱ्याच्या पत्नीच्या संघटनेला नियमांचे उल्लंघन करत हे अतिथिगृह देण्यात आले, असा आरोप गलगली यांनी केला आहे. विशेष म्हणजे सह्याद्री राज्य अतिथिगृहात कोणत्याही प्रकारची जन सुनावणी आयोजित करण्यास मज्जाव करणारे सरकार खासगी कार्यक्रमाच्या वापरास अप्रत्यक्ष प्रोत्साहन देत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

पाककृती स्पर्धेत गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार विजयी ठरले आणि त्यांनी दोन तासांच्या आत पराठा बनविण्याचा विक्रम केला. याबाबतची जाहीर माहिती तनुजा मलिक यांनी "हार्मोनी' या न्यूज लेटरच्या जुलै 2017 च्या अंकात दिली आहे. तसेच, या वेळी तनुजा मलिक यांचा वाढदिवससुद्धा साजरा करण्यात आला होता.

Web Title: mumbai news sahyadri guesthouse recipe