संजय निरूपम यांचे आरोप धादांत खोटे 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

मुंबई - संजय निरूपम यांनी मेट्रो कारशेडच्या जागेसंदर्भात अतिशय धादांत खोटे आणि मुख्यमंत्र्यांची नाहक बदनामी करणारे आरोप केले असल्याचा पलटवार करीत वस्तुस्थिती समजून न घेता केवळ सवंग लोकप्रियतेसाठी हे आरोप आहेत, असा खुलासा मुख्यमंत्री कार्यालयाने केला आहे. 

या संदर्भात माहिती देताना मुख्यमंत्री कार्यालयाने म्हटले आहे, की आरे कारशेडच्या जागेवर कुठलाही व्यावसायिक वापर नियोजित नाहीत. संपूर्ण 30 हेक्‍टर जागा ही मेट्रो कारशेडसाठी वापरली जाणार आहे. या 30 हेक्‍टर जागेत पाच हेक्‍टर हे हरित क्षेत्र आहे. त्याला कुठलीही बाधा न येता तो तसाच राहणार आहे. त्यामुळे प्रत्यक्ष कारडेपोसाठी वापरण्यात येणारी जागा ही 25 हेक्‍टर इतकीच आहे. 

निरूपम यांनी आरोप केल्याप्रमाणे यातील कोणतीही जागा वनविभागाची नाही, तर ती दुग्धविकास विभागाची आहे. वनविभागाने राष्ट्रीय हरित लवादाकडे एक प्रतिज्ञापत्र सादर करून ही आमची जागा नाही, असे स्पष्ट केले आहे. 

या जागेला मान्यता 3 मार्च 2014 रोजी पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेतील मंत्रिमंडळाने दिली. यात कारडेपो आरे येथेच राहील, या निर्णयाचाही समावेश होता. या जागेचा ताबा ऑगस्ट 2014 मध्ये देण्यात आला, त्याही वेळी विद्यमान सरकार सत्तेत नव्हते, असा खुलासाही करण्यात आला आहे.

Web Title: mumbai news sanjay nirupam congress maharashtra CM