राज्यातील कांदा विक्रीसाठी इतर राज्यात पाठवा - खोत

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

मुंबई - राज्यातील कांद्याची गुणवत्ता इतर कुठल्याही राज्यातील कांद्यामध्ये नाही. इतर राज्यात महाराष्ट्रातील कांद्याची असलेली मागणी लक्षात घेता पणन मंडळ व महाराष्ट्र शेतकरी उत्पादक कंपनीने राज्यातील कांदा इतर राज्यात विक्रीसाठी पाठवावा, असे निर्देश पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज दिले. याबाबत मंत्रालयातील दालनात महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ व महाराष्ट्र शेतकरी उत्पादक कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित केली होती. त्या वेळी ते बोलत होते.

राज्यातील कांदा इतर राज्यात निर्यात करण्यासाठी पणन मंडळ, महाराष्ट्र शेतकरी उत्पादक कंपनी, कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे अभ्यासमंडळ तयार करावे. या पथकाने पंजाब बाजार समितीमध्ये जाऊन त्या ठिकाणी असलेली कांद्याची आवक-जावक, राज्यातील कांदा साठविण्यासाठी लागणारे गोदाम, बाजार भाव, लहान व्यापारी याबाबत माहिती घ्यावी, असेही निर्देश दिले.

मूग, उडीद खरेदी नोंदणीची केंद्रे सुरू करणार
राज्यात या वर्षी मूग व उडीद खरेदी प्रक्रियेत शेतकऱ्यांचा त्रास वाचावा आणि खरेदी प्रक्रिया सुलभ पद्धतीने पार पडावी, यासाठी मोबाईल ऍपद्वारे ऑनलाइन नोंदणी पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे. राज्यात 3 ऑक्‍टोबरपासून 83 उडीद, मूग खरेदी नोंदणी केंद्रे सुरू करण्यात येणार असल्याचे पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज सांगितले.