महिला कारागृह अधीक्षकाचे वरिष्ठांकडून लैंगिक शोषण

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 12 जुलै 2017

मुंबई - कारागृह अधीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या एका महिला अधिकाऱ्यासह इतर महिला कर्मचाऱ्यांचे वरिष्ठांकडून लैंगिक शोषण केले जात असल्याच्या कथित पत्राची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे; तसेच या प्रकरणाची वरिष्ठ महिला "आयपीएस' अधिकाऱ्यांकडून चौकशी केली जावी, अशी मागणी शिवसेनेच्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

भायखळा कारागृहातील महिला कैदी मंजुळा शेट्ये हिचा कारागृहातील मारहाणीत झालेल्या मृत्यूनंतर या पत्राच्या निमित्ताने कारागृहातील धक्‍कादायक वास्तव समोर आले आहे. राज्यातील एका जिल्ह्यात कारागृह अधीक्षक असलेल्या महिला अधिकाऱ्याने डॉ. गोऱ्हे यांना पत्र पाठवले आहे. संबंधित महिला अधिकारी आणि इतर महिला कर्मचाऱ्यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून लैंगिक शोषण होत असल्याची तक्रार या पत्राच्या माध्यमातून करण्यात आली. या पत्रात अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांबाबत धक्‍कादायक माहिती देण्यात आली असल्यामुळे खळबळ उडाली आहे.

डॉ. गोऱ्हे यांनी याबाबत तातडीने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले, की पत्र मिळाल्यानंतर संबंधित महिला अधिकाऱ्याला मी तात्काळ फोन केला, मात्र तिने हे पत्र लिहिले नसल्याचे सांगितले. तिचा फोन ठेवताच लगेचच या पत्रात उल्लेख असलेल्या संबंधित अधिकाऱ्याचा फोन आला आणि त्याने भेटीची वेळ मागितली. हे सगळेच संशयास्पद असल्याने याची डॉ. प्रज्ञा सरोदे यांच्यासारख्या वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याकडून चौकशी होण्याची आवश्‍यकता आहे.

या पत्रात संबंधित कारागृहातील अधिकारी, महिला कर्मचाऱ्यांच्या नावाचा उल्लेख आहे. त्यामुळे पत्र लिहिलेल्या महिला अधिकाऱ्याने हे पत्र आपण लिहिले असल्याचे नाकारले असले तरी यातील माहितीची उच्चस्तरीय चौकशीची मागणी डॉ. गोऱ्हे यांनी केली आहे.