शिवसेनेच्या मंत्र्यांची उद्या बैठक

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

मुंबई -  शिवसेनेच्या कॅबिनेट, राज्यमंत्र्यांची शुक्रवारी (ता. १८) शिवसेना भवन येथे पक्षाच्या वतीने बैठक बोलावली आहे. या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे झाडाझडती घेणार असून, या बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्यांची कामगिरी, कर्जमाफी, संभाव्य मंत्रिमंडळ विस्तार आदी मुद्‌द्‌यांवर चर्चा होण्याची शक्‍यता आहे.

राज्यात व केंद्रात भाजपा-शिवसेनेचे सरकार आहे. शिवसेना सत्तेत असूनही केंद्र व राज्य सरकारच्या कारभारावर टीका करत असते. लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीला जेमतेम दोन वर्षांचा अवधी राहिला आहे. त्यामुळे पुढील रणनीती ठरवताना शिवसेनेच्या खात्यातील कामांचा आढावा ठाकरे या बैठकीत घेणार असल्याचे समजते. शिवसेनेच्या काही मंत्र्यांबाबत शिवसैनिकांत नाराजी आहे. शिवसैनिकांचीच कामे करत नसल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. याबाबतही या बैठकीत खल होणार आहे. राज्यात सध्या शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा गाजत आहे. शेतकरी कर्जमाफी झाली असली, तरीही ती कागदावर आहे. प्रत्यक्ष शेतकऱ्यांना कर्जमाफीचे अर्ज ऑनलाइन भरताना अडचणी येत आहेत. या कर्जमाफीबद्दलही चर्चा होणार आहे. 

तसेच विधिमंडळाच्या अधिवेशनात उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यावर भ्रष्टाचारांचे आरोप झाले आहेत. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी करण्याचे जाहीर केले आहे. शिवसेनेच्या विधानसभा आमदारांमध्ये विधान परिषदेचे सदस्य असलेल्या मंत्र्यांबाबत रोष आहे, असे बोलले जात आहे. याला देसाई यांच्यावरील आरोपांनी आणखी बळकटी मिळाली आहे. त्यामुळे संभाव्य विस्ताराबाबत ज्येष्ठ मंत्र्याबाबतही उद्धव ठाकरे चर्चा करण्याची शक्‍यता  वर्तवली जात आहे.