शिवसेना-भाजपमधील गूढतेमुळे राणेंची कोंडी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

मुंबई - कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या कॉंग्रेस सोडण्याच्या निर्णयाचे काऊंटडाऊन सुरू असतानाच शिवसेना आणि भाजपच्या गोटातील "सस्पेन्स'मुळे राणे यांची कोंडी झाल्याचे दिसत आहे. याबाबतची चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

मुंबई - कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या कॉंग्रेस सोडण्याच्या निर्णयाचे काऊंटडाऊन सुरू असतानाच शिवसेना आणि भाजपच्या गोटातील "सस्पेन्स'मुळे राणे यांची कोंडी झाल्याचे दिसत आहे. याबाबतची चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

अनेक महिन्यांपासून राणे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू असताना सोमवारी (ता. 18) सिंधुदुर्गातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राणे यांनी कॉंग्रेस सोडण्याचे स्पष्ट संकेत दिले. या संदर्भातील पुढील भूमिका राणे गुरुवारी (ता. 21) जाहीर करणार आहेत. मात्र भाजपच्या गोटात याबाबत सध्या सोयीस्कर मौन पाळण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे राज्यातील काही नेते राणे यांना दिल्लीत पाठवण्याच्या मताचे आहेत. कारण राणे यांचा स्वभाव लक्षात घेता मुख्यमंत्र्यांचीही डोकेदुखी वाढेल, असे काही जणांचे मत आहे. राणे यांना दिल्लीला पाठवायचे झाल्यास नितेश राणे यांचा मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून समावेश करावा आणि त्यांना विधानपरिषदेतील आमदारकी देण्याची मागणी राणे यांनी केल्याचे सांगण्यात आले. राणे यांना राज्यात मंत्रिपद दिल्यास नीलेश राणे यांच्यासाठी 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी आणि नितेश राणेंना विधानसभेची उमेदवारी देण्याची दुसरी मागणी आहे; मात्र या मागण्यांवर चर्चा सुरू असल्याचे पद्धतशीर वातावरण भाजप नेत्यांनी तयार करून राणेंची तडजोडीची शक्ती कमी करण्यात यश मिळवल्याचे मानण्यात येते. या पार्श्‍वभूमीवर भाजपच्या स्तरावर निर्णय घेण्याबाबत बराच कालापव्यय झाल्याने राणे पित्रा-पुत्रांच्या घुसमटीत वाढ झाली आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करून जुने हिशेब चुकते केल्याने राणे यांना कॉंग्रेस सोडण्याशिवाय पर्याय नसल्याचे मानण्यात येते. 

राज्याच्या सत्तेत शिवसेनेची घुसमट होत असल्याचे चित्र असले, तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील सूर चांगले जुळल्याचे अनेकदा दिसून आले आहे. फडणवीस यांना शिवसेनेसोबत आणखी दोन वर्षे राज्याचा गाडा हाकायचा असल्याने ठाकरे यांच्याशी चर्चा केल्याशिवाय राणे यांना भाजपमध्ये घेण्यास मुख्यमंत्री तयार नाहीत. पक्षातून फुटून जाणाऱ्या नेत्यांबाबत शिवसेनेचे धोरण स्पष्ट असल्याने राणेंच्या प्रवेशाला उद्धव ठाकरे तयार होणार नाहीत, ही बाब गृहीत धरून भाजपने वेळकाढूपणाची भूमिका अवलंबली असल्याची चर्चा आहे. तसेच मंत्रिमंडळात राणे यांच्या मांडीला मांडी लावून बसण्यास शिवसेनेचे मंत्री कदापिही तयार होणार नाहीत, असे शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. 

राणेंची "गुगली' 
शिवसेना आणि भाजपमधील या घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर राणे यांनी मंगळवारी नवीन गौप्यस्फोट केला. आपल्याला शिवसेनेचेही आमंत्रण असल्याचे सांगून त्यांनी भाजपला बुचकळ्यात पाडण्याचा प्रयत्न केला; मात्र याचे तातडीने खंडन करत शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी राणे कुटुंबाला थेट आव्हान दिले. अनेक महिन्यांतील या राजकीय घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर घटस्थापनेच्या दिवशी (ता. 22) नारायण राणे यांचा भाजपमध्ये खरोखरच प्रवेश होणार की स्वतंत्र पक्ष काढण्याची वेळ त्यांच्यावर येणार, याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

Web Title: mumbai news shiv sena narayan rane