'लॉटरी विक्रेत्यांचे प्रश्‍न अग्रक्रमाने सोडविणार'

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 ऑगस्ट 2017

मुंबई - महाराष्ट्रातील लॉटरी विक्रेत्यांचे प्रश्‍न अग्रक्रमाने सोडविण्याबरोबरच ग्राहक आणि विक्रेत्यांचे हित जपण्याच्या दृष्टीने निर्णय घेण्यात येतील, असे आश्‍वासन महाराष्ट्राचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लॉटरी विक्रेता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले. 

लॉटरी विक्रेत्यांनी विविध मागण्यांसाठी आझाद मैदानात धरणे आंदोलन केले. त्या पार्श्‍वभूमीवर भाजपप्रणीत ऑनलाईन आणि पेपर लॉटरी विक्रेता संघटनेचे अध्यक्ष अनुज वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने नुकतीच अर्थमंत्री मुनगंटीवार यांची भेट घेतली. या वेळी महाराष्ट्र सरकारची स्वतःची लॉटरी सुरू करण्याच्या दृष्टीने कारवाई करण्यात येईल; तसेच राज्यातील प्रत्येक एसटी डेपोच्या आवारात लॉटरी विक्रेत्यांसाठी स्टॉल आणि ओळखपत्र या प्रमुख मागण्यांवर सरकार सहानुभूतीने विचार करत आहे. जीएसटी 28 टक्‍क्‍यांवरून 12 टक्के करण्याच्या लॉटरी विक्रेत्यांच्या मागणीचा पाठपुरावा करण्यात येईल; तसेच लॉटरी उद्योगातील प्रश्‍न सोडवून त्यात स्थिरता आणि पारदर्शकता आणण्यासाठी लवकरच उच्चस्तरीय बैठक घेण्यात येईल, असे आश्‍वासन त्यांनी दिले. बैठकीला मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार, लॉटरी विक्रेत्यांचे ज्येष्ठ नेते विलास सातार्डेकर, उपाध्यक्ष जितेंद्र राऊत, राजेश बोरकर, बबन तोडणकर, सूर्यकांत धावले, वॉर्ड अध्यक्ष महेंद्र खेडेकर, संजीव जयस्वाल, सचिन वारंगे उपस्थित होते.