ठाण्यातील तुरुंगात कैद्यांची दाटी 

ठाण्यातील तुरुंगात कैद्यांची दाटी 

मुंबई - कैद्यांची संख्या वाढल्याने ठाणे मध्यवर्ती तुरुंगात त्यांची दाटी झाली आहे. नव्याने येणाऱ्या कैद्यांना तुरुंगात घेतले जात नसून, तळोजा येथील तुरुंगात त्यांची रवानगी केली जात आहे. 

राज्यात नऊ मध्यवर्ती, 31 जिल्हा तुरुंग, 13 खुले तुरुंग, तर 172 उपतुरुंग आहेत. पुणे आणि मुंबईत महिलांकरिता स्वतंत्र तुरुंग आहेत. राज्यातील तुरुंगांत क्षमतेपेक्षा अधिक कैदी ठेवले जात आहेत. कैद्यांना दाटीवाटीने राहावे लागत असल्याने संसर्गजन्य आजार होत आहेत. तुरुंगातील कैद्यांची क्षमता आणि त्यांना देण्यात येणाऱ्या सोयीसुविधांबाबत न्यायालयात याचिका करण्यात आली होती. क्षमतेपेक्षा अधिक कैदी झाल्याने नव्या तुरुंगासाठी जागेची पाहणी करत असल्याचे तुरुंग प्रशासनाने न्यायालयात सांगितले होते. 

ठाणे मध्यवर्ती तुरुंगात 1105 कैद्यांची क्षमता आहे; मात्र येथे सध्या 3300 कैदी आहेत. त्यामुळे नव्या कैद्यांना तुरुंगात प्रवेश दिला जात नाही. त्यांना तळोजा येथे पाठवले जात आहे. सध्या तुरुंगातल्या बराकींची दुरुस्ती सुरू आहे, अशी माहिती तुरुंग अधीक्षक नितीन वायचळ यांनी दिली. 

ऑपरेशन ट्रॅकिंग 
कल्याणमधील आधारवाडी तुरुंगात काही दिवसांपूर्वी कैद्याने आत्महत्या केली. कैद्यांच्या आत्महत्येचे प्रकार रोखण्यासाठी राज्यातील तुरुंगात "ऑपरेशन ट्रॅकिंग' हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्याअंतर्गत मानसिक तणावातील कैद्यांचे समुपदेशन केले जाणार आहे. हिंसक होणाऱ्या कैद्यांना स्वतंत्र बराकीत ठेवले जाईल. ऑपरेशन ट्रॅकिंग उपक्रम राबवून त्याचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवला जाईल, असे अपर पोलिस महासंचालक (तुरुंग प्रशासन) डॉ. भूषण कुमार उपाध्याय यांनी सांगितले. 

इक्‍बाल तळोजातील अंडासेलमध्ये? 
ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केलेला दाऊदचा भाऊ इक्‍बाल कासकर याला न्यायालयीन कोठडी मिळाल्यास त्याची रवानगी तळोजा तुरुंगात केली जाईल. तळोजातही काही महत्त्वाचे आरोपी आहेत; मात्र त्यांच्यात वाद होण्याची शक्‍यता लक्षात घेऊन इक्‍बालला तळोजातील अंडासेलमध्ये ठेवण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले. 

राज्यात... 

09  - मध्यवर्ती तुरुंग  

31 -  जिल्हा तुरुंग 

13  -  खुले तुरुंग 

172  -  उपतुरुंग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com