ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडे यांचे निधन 

ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडे यांचे निधन 

मुंबई - "आकाशगंगा', "भालू', "आम्ही जातो अमुच्या गावा', "प्रेमासाठी वाट्टेल ते' अशा काही मराठी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा अमीट ठसा उमटविणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडे (वय 72) यांचे आज निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पती प्रकाश भेंडे, मुले प्रसाद आणि प्रसन्न भेंडे, सून श्वेता महाडिक-भेंडे, किमया भेंडे आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर रात्री उशिरा शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

गेल्या काही दिवसांपासून उमा भेंडे आजारी होत्या. वयोमानामुळे त्यांची प्रकृती बरीच खालावली होती. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. 

साठ व सत्तरच्या दशकातील अनेक चित्रपटांतून उमा भेंडे यांनी संस्मरणीय भूमिका केल्या. कलेचा वारसा असलेल्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांची आई रमादेवी कोल्हापूरला प्रभात कंपनीत काम करत असे, तर वडील श्रीकृष्ण साक्रीकर अत्रे यांच्या कंपनीत होते. त्यामुळे त्यांनी कलेची आवड जोपासली. लता मंगेशकर यांनी त्यांना उमा हे नाव दिले होते. त्यांचे मूळ नाव अनसुया साक्रीकर होते. त्यांनी मिरजकर यांच्याकडे कथ्थक आणि भरतनाट्यमचे शिक्षणही घेतले होते. कोल्हापूरला अनेक मेळ्यांमध्ये त्या काम करायच्या. तसेच चांदीची पदकेही त्यांनी मिळविली होती. त्यांची आई भालजी पेंढारकर यांच्याकडे त्यांना घेऊन गेल्यानंतर त्यांची 

"आकाशगंगा' या चित्रपटातील छोट्या सीतेच्या भूमिकेसाठी निवड झाली. त्यानंतर लगेच "अंतरिचा दिवा' या चित्रपटात त्यांना नायकाच्या बहिणीची भूमिका मिळाली. त्यानंतर त्या नायिका म्हणून पडद्यावर सुमारे पंधरा वर्षे वावरल्या. 

अनेक चित्रपटांचे रौप्य महोत्सव 
"मधुचंद्र', "आम्ही जातो अमुच्या गावा', "अंगाई', "काका मला वाचवा', "शेवटचा मालुसरा', "मल्हारी मार्तंड', "भालू', "स्वयंवर झाले सीतेचे' असे अनेक यशस्वी चित्रपट त्यांचे आले. "अशी ही साताऱ्याची तऱ्हा' या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. अनेक चित्रपटांनी रौप्य महोत्सव साजरे केले. "नाते जडले दोन जिवांचे' चित्रपटाच्या निमित्ताने प्रकाश भेंडे यांच्याशी जुळलेले नातेही नंतर प्रत्यक्षातही जुळले. लग्नानंतरही त्यांनी अनेक चित्रपट केले. त्यांनी स्वत:ची श्री प्रसाद चित्र ही संस्था सुरू करून चित्रनिर्मिती केली. "भालू', "चटकचांदणी', "आपण यांना पाहिलंत का', "प्रेमासाठी वाट्टेल ते', "आई थोर तुझे उपकार' हे चित्रपट त्यांनी बनविले. त्यांनी भालजी पेंढारकर, वसंत जोगळेकर, राजदत्त, माधवराव शिंदे, कमलाकर तोरणे, मुरलीधर कापडी, हिंदीत सत्येन बोस (दोस्ती) अशा अनेक दिग्गज दिग्दर्शकांबरोबर काम केले. त्यांनी तेलुगू चित्रपटांमध्येही काम केले होते. 2012 साली उमा भेंडे यांना अखिल भारतीय चित्रपट महामंडळातर्फे चित्रभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com