महाराष्ट्राच्या दोन योजना उत्तर प्रदेशही राबवणार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 मे 2017

मुंबई - महाराष्ट्रात सवलतीच्या दरात "सॅनिटरी नॅपकिन' पुरवणारी अस्मिता योजना आणि शून्य टक्के व्याजदराने महिला बचत गटांना कर्ज देणारी सुमतीबाई सुकळीकर महिला सक्षमीकरण या योजना आम्हीही राबवणार आहोत, असे उत्तर प्रदेशच्या महिला व बालविकासमंत्री रिटा बहुगुणा यांनी सांगितले.

उत्तर प्रदेशात महिलांसाठी खास योजना राबवण्याबाबत मोठा कार्यक्रम होणार आहे. त्याचे निमंत्रण बहुगुणा यांनी महाराष्ट्राच्या महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांना दिले. या वेळी मंत्री असलेल्या देशातील महिलांना या कार्यक्रमाला बोलावण्याची सूचना मुंडे यांनी केली. महाराष्ट्रातील किशोरवयीन मुलींकरिता "सॅनिटरी नॅपकिन'चा वापर वाढवण्यासाठी कायमस्वरूपी योजना सुरू करण्यासाठी, तसेच महिलांच्या बचत गटांच्या व्यवसायास वाव देऊन शाळांतील मुलींना "सॅनिटरी नॅपकिन' सवलतीच्या दरात देण्यासाठी अस्मिता योजना सुरू करण्यात आली आहे.

राज्यातील महिलांमध्ये उद्यमशीलता वाढावी, यासाठी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती मोहिमेनुसार स्वयंसहायता समूहांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज मिळावे, यासाठी सुमतीबाई सुकळीकर उद्योगिनी महिला सक्षमीकरण योजना राबवण्यात येत आहे. 2016 पासून सुरू झालेल्या या योजनांमुळे प्रभावित झालेल्या मंत्री बहुगुणा यांनी या योजना उत्तर प्रदेशातही राबवण्याचा निर्णय घेतला आहे.