'ग्रामपंचायती'तून विधानसभेची तयारी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 सप्टेंबर 2017

'मातोश्री'वर मॅरेथॉन बैठक; काम न करणाऱ्यांना पक्षप्रमुखांचा इशारा

'मातोश्री'वर मॅरेथॉन बैठक; काम न करणाऱ्यांना पक्षप्रमुखांचा इशारा
मुंबई - केंद्रीय मंत्रिमंडळाच्या रविवारी झालेल्या विस्तारात भाजपने खड्यासारखे बाजूला केल्यामुळे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संतापले आहेत. त्यांनी आता आगामी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या मैदानातून लोकसभा आणि विधानसभेची तयारी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी आज "मातोश्री'वर ठाकरे यांनी तब्बल दोन तासांहून अधिक वेळ मॅरेथॉन बैठक घेतली. या वेळी त्यांनी काम न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना थेट घरी बसविण्याचा इशाराच दिला.

भाजपने मित्रपक्षांना डावलून केंद्रातील मंत्रिमंडळाचा विस्तार केला, त्यावर शिवसेनेने जळजळीत प्रतिक्रिया नोंदवली. भाजपबरोबर शिवसेनेचे फक्त नाते तुटल्याचे जाहीर होणे शिल्लक आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची चाचपणी शिवसेनेने सुरू केली आहे. त्यासाठी ग्रामीण भागातील पक्षाचा पाया मजबूत करण्यात येणार आहे. ऑक्‍टोबरमध्ये होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपासून त्याची सुरवात करण्यात येणार आहे. शिवसेनेचे नेते आणि जिल्हा संपर्कप्रमुख यांच्या उपस्थितीत "मातोश्री'वर झालेल्या बैठकीत ठाकरे यांनी काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना मोठी जबाबदारी देण्याचे आदेश दिले. तसेच, काम न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना घरी बसविण्याचा इशारा दिला आहे. पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात शिवसेनेला वाढीची संधी आहे, त्यामुळे या भागांवर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करणार असल्याचे सांगण्यात आले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप एक नंबरचा पक्ष ठरला आहे. त्यामुळे भाजपला धक्का देण्यासाठी शिवसेनेने ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. ही संघटनात्मक बैठक होती.

ग्रामपंचायत निवडणुकीबाबत चर्चा करण्यात आली. मात्र, यात विस्ताराबाबत चर्चा झाली नसल्याचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. या बैठकीत शिवसेनेचे नेते गजानन कीर्तिकर, रामदास कदम यांनी पक्षाच्या बांधणीवरच नाराजी व्यक्त केली. भविष्यात पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करताना नेत्यांना विश्‍वासात घेतले जाईल, असे आश्‍वासन ठाकरे यांनी दिले.

दसरा मेळाव्यात भाजपच लक्ष्य?
शिवाजी पार्कवर होणारा शिवसेनेचा दसरा मेळावा हा पक्षाच्या पुढील राजकारणाची दिशा ठरवणारा असतो. भाजप पदोपदी अपमानित करत असल्याने शिवसैनिकांपासून थेट पक्षप्रमुखही प्रचंड नाराज आहेत. त्यामुळे या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे भाजपलाच लक्ष्य करण्याची शक्‍यता आहे. या माध्यमातून आगामी लढाई भाजपबरोबरच असल्याचे सांगण्यात येणार असल्याचे समजते.

Web Title: mumbai news vidhansabha election preparation in grampanchyat