राज्यात पावसाची बॅटिंग; मुंबई कोलमडली; बळीराजा सुखावला

राज्यात पावसाची बॅटिंग; मुंबई कोलमडली; बळीराजा सुखावला

पुणे : राज्यात आज (मंगळवार) पावसाने सर्वदूर हजेरी लावली. विदर्भ, मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्रासह कोकणापर्यंत सगळीकडे पावसाच्या हजेरीने वातावरण ढवळून निघाले आहे. मुंबईमध्ये मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी वाहतूक व्यवस्था कोलमडून पडली. वऱ्हाडामध्ये नद्यांना पूर आला आहे. छत्तीसगडमध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मॉन्सून सक्रिय झाला आहे. पावसामुळे खरिप पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. शिवाय तलाव व धरणांतील पाणीसाठ्यातही वाढ होत आहे. 

मुंबईमध्ये सोमवारी (ता. 28) रात्रीपासून पाऊस पडत आहे. मुंबईकरांना पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. यामुळे सकाळी कामावर जाणाऱया चाकरमान्यांचे अतोनात हाल होत असल्याचे चित्र विविध भागात दिसत होते. पावसामुळे रेल्वेसह विमानसेवेवरही परिणाम झाला आहे. दरम्यान, येत्या 24 तासांत मुंबई शहर आणि उपनगरात पावसाच्या जोरदार, अतिजोरदार सरी कोसळतील, असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे 

मध्य महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील 24 धरणापैकी 10 धरणं 100 टक्के भरली. सहा धरणात 90 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक पाणीसाठा झाला, उर्वरित आठ धरणं 60 ते 90 टक्के भरली. कोयना परिसरात काल रात्रीपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे कोयना धरणातील पाणी साठ्यात 3.56 टीएमसीने वाढ झाली. काल दिवसभर चांगला पाऊस झाल्याने धरणाच्या पाण्याची उंची तब्बल दोन फुटाने वाढली. परवापेक्षा कोयनेला 125, नवजाला 150 तर महाबळेश्‍वरला 83 मिलीमीटर जास्त झाला आहे. त्यामुळे चोवीस तासात कोयनेने 95 टिएमसीचा टप्पा ओलांडला आहे. आजही धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सकाळ पासून पावसाची रिमझीम सुरू आहे. 

पुणे जिल्ह्यातील धरणातून आज सकाळी आठ वाजल्यापासून जवळपास 55 हजार क्‍युसेकने पाणी सोडले जात आहे. ते पाणी उजनी धरणात येते. दुपारी 12 वाजता उजनी (सोलापूर) धरणातून भीमा नदीमध्ये दीड हजार, कालव्यातून 400 तर बोगद्यातून 50 क्‍सुसेकने पाणी सोडण्यास सुरवात झाली आहे. धरणात दौंड येथून 42 हजार 627 क्‍युसेकने पाणी मिसळत आहे. 

वऱ्हाडातील बुलडाणा जिल्ह्यात जळगाव जामोद, संग्रामपुर, मलकापुर, मोताळा तालूक्‍यात तर अकोला जिल्ह्यात अकोला तालुक्‍यात जोरदार वृष्टी झाली. अकोला तालुक्‍यात तीन मंडळात मिलिमीटर पेक्षा अधिक पाऊस झाला. वर्धा जिल्ह्यातही दमदार पावसाची नोंद झाली. सातपुडा पर्वत रांगामधून वाहणाऱ्या बहुतांश नद्यांना पूर आले. 

नागपूर शहरात गेल्या पाच दिवसांपासून नियमितपणे पावसाच्या सरी पडताहेत. मंगळवारीदेखील सकाळी दोन-अडीच तास संततधार बरसला. हवामान विभागाने शहरात सकाळी साडेआठपर्यंत 17.4 मिलिमीटर पावसाची नोंद केली. विदर्भात अकोला 66.2 मिलिमीटर, ब्रम्हपुरी 64.4 मिलिमीटर, गोंदिया 33.8 मिलिमीटर, वर्धा 24.6 मिलिमीटर पाऊस झाला. 

मराठवाड्यातील सेलू (जि.परभणी) तालुक्‍यात अतिवृष्टीने दुधना, कसूरा नदीला पूर आला. वालूर-सेलू, वालूर - मानवत रोड रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेले. वाहतूक काही काळ बंद होती. जालना तालुक्‍यातील साळेगाव येथे मुसळधारमुळे घर कोसळले, रात्री 1 वाजता घडली घटना, तीन जण जखमी झाले. जखमींवर जालना येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

उत्तर कोकणातील रायगड जिल्ह्यातील चारी मंडळात मिलिमीटर पाऊस पडला. अनेक ठिकाणी मुसळधार सुरू होती. मुंबईला पावसाने झोडपून काढले असून, रस्त्यासह ठिकठिकाणी पाणी साचल्याने मुंबईची अक्षरश: दाणादाण उडाली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com