शिवसेना = मुंबई हे समीकरण इतिहासजमा - फडणवीस

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 21 फेब्रुवारी 2017

मुंबई - शिवसेना व मुंबई हे समीकरण आता संपले आहे. मराठी माणूस, मुंबई वेगळी करण्याचा डाव, असे भावनिक आवाहन आता मुंबईकर स्वीकारणार नाहीत. 2014 च्या विधानसभा निवडणुकीतच हे चित्र स्पष्ट झाले असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला फटकारले. जाहीर प्रचारानंतर विविध माध्यमांना मुलाखती देताना त्यांनी मतदानाच्या अगोदरचे अखेरचे षटकार ठोकण्याचा प्रयत्न केला.

मुंबई - शिवसेना व मुंबई हे समीकरण आता संपले आहे. मराठी माणूस, मुंबई वेगळी करण्याचा डाव, असे भावनिक आवाहन आता मुंबईकर स्वीकारणार नाहीत. 2014 च्या विधानसभा निवडणुकीतच हे चित्र स्पष्ट झाले असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला फटकारले. जाहीर प्रचारानंतर विविध माध्यमांना मुलाखती देताना त्यांनी मतदानाच्या अगोदरचे अखेरचे षटकार ठोकण्याचा प्रयत्न केला.

शिवसेना- भाजप यांची युती होती. ज्या वेळी युती होती तेव्हा शिवसेनेला मुंबईत मोठे यश मिळतच होते. लोकसभा निवडणुकीत आमची युती होती, त्या वेळी शिवसेनेलाही चांगले यश मिळाले. मात्र, विधानसभा निवडणुकीत युती तुटल्यानंतर मुंबईत भाजपचे 15, तर शिवसेनेचे 14 आमदार विजयी झाले, यावरून मुंबई म्हणजेच शिवसेना हे समीकरण त्याचवेळी संपल्याचा दावा फडणवीस यांनी केला.

काल व आज दिवसभर त्यांनी "वर्षा' या निवासस्थानी विविध प्रसारमाध्यमांना दीर्घ मुलाखती दिल्या.

शिवसेना हा भाजपचा शत्रू नाही. मुंबई महापालिकेत युती करताना आम्ही पारदर्शकतेचा अजेंडा त्यांच्यासमोर ठेवला होता. मात्र, त्यांना पारदर्शकता नको होती, त्यामुळेच शिवसेना नेत्यांनी युती तोडण्याचा निर्णय घेतल्याचा आरोपही फडणवीस यांनी या वेळी केला. जागावाटपात काही कमी- जास्त झाले असते तरी भाजपने ते मान्य केले असते. मात्र, पारदर्शकतेच्या मुद्द्यावर भाजप कोणतीही तडजोड करण्यास तयार नव्हता. हीच अडचण शिवसेना नेत्यांची झाल्याने युती तोडण्याचा निर्णय घेतल्याचे फडणवीस म्हणाले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यावर कठोर शब्दांत टीका केल्याचाही फायदा भाजपलाच होणार असल्याचा दावा करताना फडणवीस म्हणाले, की गुजराती मतदारांना शिवसेनेची ही भूमिका बिल्कूल पटलेली नाही, त्यामुळे गुजराती मतदार हे भाजपलाच मतदान करतील. शिवसेनेच्या टीकेमुळे भाजपचाच फायदा अधिक झाल्याचे स्पष्ट होईल.

या वेळी त्यांनी खासदार किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांचीही चौकशी करण्यात येईल असे जाहीर केले. उद्धव ठाकरे यांच्या काही संशयास्पद कंपन्यांमध्ये मनिलॉंड्रिंग झाल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. हा आरोप गंभीर असून, सोमय्या यांनी त्याबाबतचे पुरावे संबंधित यंत्रणेकडे दिल्यास त्याची चौकशी करण्यात येईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Web Title: Mumbai Shiv Sena is the equation of the past