'निकालासाठी हवी आयोगाची परवानगी '

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

मुंबई - आगामी महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीची मतमोजणी पूर्ण झाली तरी आयोगाच्या परवानगीशिवाय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निकाल जाहीर करता येणार नाही, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्‍त जे. एस. सहारिया यांनी "सकाळ' ला दिली. 

मुंबई - आगामी महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीची मतमोजणी पूर्ण झाली तरी आयोगाच्या परवानगीशिवाय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निकाल जाहीर करता येणार नाही, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्‍त जे. एस. सहारिया यांनी "सकाळ' ला दिली. 

निवडणुकीची मतमोजणी सुरू झाल्यावर प्रत्येक फेरीची स्थिती निवडणूक आयोगाच्या मेल अकाउंटवर टाकण्यात येणार आहे. त्यामुळे कुणाचे आक्षेप किंवा सद्य:स्थिती याची माहिती आयोगाला समजेल. मतमोजणी पूर्ण झाल्यावर त्याचा तपशील आयोगाकडून तपासण्यात येईल आणि त्यानंतर संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला निकाल जाहीर करण्याचा ओदश देण्यात येतील, अशी माहिती सहारिया यांनी दिली. प्रत्येक मतदान केंद्राबाहेर उमेदवारांच्या संपत्ती तसेच गुन्ह्यांचा तपशील फ्लेक्‍सद्वारे लावण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. महापालिका क्षेत्रातील उमेदवारांची हिच माहिती वर्तमानपत्रात जाहिरात देऊन करण्यात येणार असल्याचे सहारिया यांनी सांगितले. 

मतदान जागृतीसाठी टाटा, महिंद्रा 
महानगरपालिका निवडणुकीतील मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या मतदार जागृती मोहिमेला प्रोत्साहन देण्यासाठी उद्योग जगतातील मान्यवरांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यात रतन टाटा, आनंद महिंद्रा, हर्ष गोयंका आदींचा समावेश आहे, अशी माहिती सहारिया यांनी दिली. ग्रामीण भागाच्या तुलनेत महानगरपालिकांमध्ये मतदानाचे प्रमाण तुलनेने कमी असते. ते वाढविण्यासाठी राज्य निवडणूक आयोगातर्फे जाहिराती, होर्डिंग, पथनाट्य, विद्यार्थ्यांच्या जनजागृती फेऱ्या, सहकारी गृहनिर्माण संस्थांचे सहकार्य, सोशल मीडिया, कम्युनिटी रेडिओ आदींद्वारे व्यापक प्रमाणात जनजागृती केली जात आहे. यात विविध उद्योग समूहांनीही सक्रिय सहभागी व्हावे यादृष्टीने आयोगातर्फे सर्व संबंधितांना आवाहन करण्यात आले होते. आयोगाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन रतन टाटा, आनंद महिंद्रा, हर्ष गोयंका यांनी आयोगाच्या कार्यालयात भेट देऊन प्रत्यक्ष चर्चा केली आहे. आपापल्या उद्योगसमूहातील कर्मचाऱ्यांना मतदानासाठी वेळेची सवलत दिली जाईल. त्याचबरोबर त्यांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल. उद्योगसमूहाच्या सर्व ठिकाणी मतदार जागृतीबाबत फलक लावण्यात येतील, अशी ग्वाही या तिघांनी दिल्याचे सहारिया यांनी सांगितले. 

Web Title: must commission to allow