सामाजिक कार्यकर्त्या कल्पना इनामदारांवर हल्ला 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 जुलै 2017

शिर्डी - शेतकऱ्यांना सरसकट व संपूर्ण कर्जमाफी मिळावी, या मागणीसाठी पुणतांबे (ता. राहाता) येथे बेमुदत उपोषणास बसलेल्या मुंबईच्या सामाजिक कार्यकर्त्या कल्पना इनामदार यांच्यावर बुधवारी (ता. 26) मध्यरात्रीनंतर दोन वाजता अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. त्यांच्या कपाळाला मार लागला असून, साईबाबा संस्थानच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, इनामदार यांनी गुरुवारी उपोषण मागे घेतले. 

इनामदार यांचे पुणतांब्यात सात दिवसांपासून उपोषण सुरू होते. काल मध्यरात्रीनंतर दोनच्या सुमारास त्या उपोषण मंडपाजवळ उभारलेल्या स्वच्छतागृहात गेल्या, तेव्हा हा हल्ला झाला. आपला गळा आवळण्याचा प्रयत्न झाल्याचेही त्यांनी सांगितले. पोलिसांच्या मदतीने त्यांना येथील साईबाबा संस्थानच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. हल्ला झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी आज उपोषण मागे घेतले. 

कोणीही नेता भेटला नाही 
उपोषण आंदोलनाचे नियोजन करणारे पुणतांब्याचे कार्यकर्ते बाळासाहेब चव्हाण यांनी सांगितले, की इनामदार आठ दिवसांपूर्वी नवी मुंबई येथून आल्या. त्यांनी स्वखर्चाने मंडप व अन्य सोयी करीत उपोषण सुरू केले. आवश्‍यक सर्व खर्च त्या स्वतः करत होत्या. शेतकरी संपाच्या आंदोलनात आघाडीवर असलेल्यांपैकी कोणीही नेता त्यांना भेटण्यासाठी आला नाही. पुणतांब्यात त्यांच्यासोबत दोन मोटारी व तीन- चार सहायक होते. 

कोण आहेत कल्पना इनामदार 
इनामदार यांचा नवी मुंबई येथे तयार कपड्यांचा व्यवसाय आहे. त्यांनी यापूर्वी आटपाडी (जि. सांगली) व जत (जि. सातारा) येथे शेतकऱ्यांच्या पाणीप्रश्‍नावर उपोषण केले होते. त्यानंतर तेथील कालव्याला पाणी सोडण्यात आले. तेथील तीन- चार शेतकरी पुणतांबे येथे आले होते. सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या बदलीच्या विरोधात त्यांनीच न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. 

शेतकऱ्यांचा आवाज दडपण्यासाठी सरकारने भाडोत्री गुंड पाठवून माझ्यावर हल्ला केला. 
- कल्पना इनामदार, सामाजिक कार्यकर्त्या