केंद्राकडून सीबीआयचा गैरवापर - मायावती

कस्तुरचंद पार्क - बसपच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांना चांदीचा हत्ती भेट देताना कार्यकर्ते; शेजारी राष्ट्रीय महासचिव सतीशचंद्र मिश्रा, प्रदेशाध्यक्ष विलास गरुड आणि इतर.
कस्तुरचंद पार्क - बसपच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांना चांदीचा हत्ती भेट देताना कार्यकर्ते; शेजारी राष्ट्रीय महासचिव सतीशचंद्र मिश्रा, प्रदेशाध्यक्ष विलास गरुड आणि इतर.

नागपूर - केंद्रातील मोदी सरकारकडून विरोधी पक्षच संपविण्याचा प्रयत्न होत आहे. यासाठी सीबीआय, आयटी, ईडीसारख्या संस्थांचा गैरवापर होत आहे. भाजप सरकार आरएसएसचा हिंदुत्ववादी व जातीयवादी अजेंडा राबवीत आहे. त्यामुळे त्यांची सत्ता आल्यानंतर दलित, आदिवासी, मुस्लिम, गरीब व एकूणच मागासवर्गीयांवर अन्याय, अत्याचार वाढल्याचा आरोप बसपच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी आज केला. 

बसपच्या वतीने रविवारी कस्तुरचंद पार्क येथे महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश-तेलंगणा व कर्नाटक येथील कार्यकर्त्यांचा महामेळावा आयोजित केला होता. यावेळी त्या बोलत होत्या. मंचावर पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आनंदकुमार, राष्ट्रीय महासचिव सतीशचंद्र मिश्रा, प्रदेश प्रभारी खासदार वीरसिंग, प्रदेशाध्यक्ष विलास गरुड, संदीप ताजने, नागोराव जयकर उपस्थित होते.

यावेळी कार्यकर्त्यांच्या वतीने मायावती यांना सोन्याचा मुकुट, चांदीचा हत्ती व तलवार भेट देण्यात आली. केंद्र सरकारवर मायावती यांनी चौफेर टीका केली. भाजप सरकार दलितांच्या द्वेषाचे राजकारण करीत असल्याने राज्यसभेचा राजीनामा दिल्याचे स्पष्ट करीत त्या म्हणाल्या, राजीनामा दिल्यानंतर मी दलितांसोबतच, आदिवासी, मुस्लिम आणि इतर मागासवर्गीय लोकांच्या उत्थानासाठी देशव्यापी दौरे सुरू केले. भाजप सरकार दलितांऐवजी केवळ उद्योगपतींच्या हिताचा एजेंडा राबवीत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांनी भाजपसोबतच काँग्रेसवरही टीका केली. हे दोन्ही पक्ष दलितविरोधी असल्याचे मायावती म्हणाल्या. 
उत्तर प्रदेशमधील सरकार दलितांवरील अत्याचाराच्या प्रकरणात साधी एफआयरदेखील दाखल करत नाही. महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या करीत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. भाजपच्या जातीयवादी अजेंड्याबाबत लोकांमध्ये जनजागृती करा, असे आवाहनही मायावती यांनी कार्यकर्त्यांना केले. लोकसभा निवडणुकीपूर्वी अयोध्येत राममंदिरचे काम सुरू करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. यातून दलित, ओबीसींना काहीच मिळणार नाही. उलट तुमच्या खिशातील पैसे कमी होऊन पुजाऱ्यांचा फायदा होणार आहे. त्यामुळे दलित, ओबीसींनी राममंदिर आंदोलनापासून दूर राहण्याचा सल्लाही त्यांनी दिला. मेळाव्यात बसपाचे नागपूर शहराध्यक्ष राजू चांदेकर, नगरसेविका वंदना चांदेकर, नगरसेवक जितेंद्र घोडेस्वार, शहर उपाध्यक्षा सोनाली रामटेके यांच्यासह कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंडळ आयोगाच्या विरोधकांना ओबीसींचा पुळका
ओबीसींना आरक्षण देणारा मंडळ आयोग लागू केल्यानंतर भाजपने त्यावेळी मोठा विरोध करून याविरुद्ध आंदोलन केले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न देण्याचे मान्य केल्याने तत्कालीन व्ही. पी. सिंग सरकारचा पाठिंबा काढून सरकार पाडले होते. आता त्याच भापजला ओबीसी, दलितांचा पुळका आला. त्यांच्यापासून सावध राहण्याचा इशारा त्यांनी दिला.

हिंदू धर्म सोडण्याचा इशारा 
दलितांवर अत्याचार होत असून त्यांना चांगली वागणूक दिली जात नाही. डॉ. बाबासाहेबांनी हिंदू धर्मात सुधारणेची संधी दिली होती. मात्र, हिंदू धर्मात असेच सुरू राहिले, तर आपणही योग्यवेळी आपल्या असंख्य लोकांसह हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्म स्वीकारणार, या वक्तव्याचा त्यांनी आज पुनरुच्चार केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com