मुख्यमंत्री धावले कृषिमंत्र्यांच्या मदतीला

मुख्यमंत्री धावले कृषिमंत्र्यांच्या मदतीला

नागपूर - कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी बोंडअळी तसेच तुरतुड्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात येईल, असे आश्‍वासन सभागृहात दिले. परंतु, राधाकृष्ण विखे पाटील, पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांना एकरी मदत किती देणार, अशी विचारणा करीत कृषिमंत्र्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कृषिमंत्र्यांच्या मदतीला धावले अन्‌ विरोधकांना गप्प केले.

आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी विधानसभेत मांडलेल्या ठरावावरील चर्चेला उत्तर देताना कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी बोंडअळीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्यात येत असल्याचे सांगितले. बीटी कॉटनच्या ३२ कंपन्यांचे नमुने घेतल्याचे सांगून काही कंपन्यांवर कोर्टात प्रकरण दाखल केल्याचे ते म्हणाले. महिको कंपनीचे गोदाम सील केले असून, शेतकऱ्यांची लूट करणाऱ्याची गय केली जाणार नाही, असे आश्‍वासन त्यांनी दिले. कृषी खात्याची अनेक रिक्त पदे भरण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यातील दीडशेपैकी ५० कृषी महाविद्यालये बोगस असून, ते बंद करण्याचा निर्णयही त्यांनी सभागृहात सांगितला. बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीकविमा, कंपन्यांकडून नुकसानभरपाई तसेच मदत व पुनर्वसन खात्यातर्फे मदत दिली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

या वेळी विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एकरी किती मदत करणार? अशी विचारणा करीत कृषिमंत्र्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. विरोधी  बाकावरील इतर सदस्यांनीही गोंधळास सुरुवात केली. गोंधळ बघताच मुख्यमंत्री फडणवीस यांनी काही शेतकऱ्यांना तिन्ही प्रकारची मदत मिळणार असल्याचे सांगितले.

सरकारच्या मदत व पुनर्वसन खाते, ज्या कंपन्यांच्या बियाणामुळे नुकसान झाले, त्यांच्याकडून नुकसानभरपाई आणि पीकविमा अशी तिन्ही प्रकारची मदत केली जाईल. मात्र, नेमकी मदतीची गोळाबेरीज करावी लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com