कीटकनाशकांमुळे ५१ शेतकऱ्यांचा मृत्यू

कीटकनाशकांमुळे ५१ शेतकऱ्यांचा मृत्यू

नागपूर - राज्यात कापूस व सोयाबीन पिकांवर कीटकनाशक फवारणी करताना चार महिन्यांत तब्बल ५१ शेतमजूर आणि शेतकऱ्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती मंगळवारी विधान परिषदेत कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी लेखी प्रश्‍नाच्या उत्तरात दिली. तसेच गृह, कृषी, सार्वजनिक आरोग्य, ग्रामविकास व वन विभागाच्या अधिपत्याखालील प्रशासनातील क्षेत्रीय पातळीवरील अधिकाऱ्यांनी विषबाधेचा अहवाल प्रपत्रात वरिष्ठांना सादर केला नसल्याचा खुलासाही त्यांनी केला. 

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, प्रकाश गजभिये, हेमंत टकले, नरेंद्र पाटील, सुनील तटकरे, किरण पावसकर यांच्यासह इतर सदस्यांनी हा प्रश्‍न उपस्थित केला होता. कालपर्यंत २६ जणांचाच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत होते. ‘सकाळ’ने या विषयावर वृत्त मालिका केली होती. यानंतर संपूर्ण राज्यभर खळबळ उडाली होती. याची दखल शेवटी प्रशासनास घ्यावी लागली. 

उत्तरात कृषिमंत्र्यांनी विदर्भातील यवतमाळ, अकोला, बुलडाणा, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि धुळे या जिल्ह्यांसह मराठवाडा व खानदेशात बीटी कापूस व सोयाबीन या पिकांवर जुलै ते ऑक्‍टोबर या कालावधीत कीटकनाशकांची फवारणी करताना ५१ शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यासे सांगितले. यवतमाळ जिल्ह्यात जुलै ते ऑक्‍टोबर २०१७ या कालावधीत कीटकनाशकांची फवारणी करताना विषबाधा झाली. त्यात २१ शेतकरी व शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. एकूण ७८३ शेतमजूर व शेतकऱ्यांना विषबाधा झाल्याचेही निदर्शास आले आहे.

दोन लाखांचे विमा संरक्षण
विषबाधा प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य शासनाने विशेष तपास पथकाची स्थापना केलेली आहे. कीटकनाशक कायद्यामधील तरतुदीनुसार दोषी कंपन्या व विक्रेते यांच्यावर न्यायालयात खटले, तसेच पोलिसांत गुन्हे दाखल केलेले आहेत. तसेच परवाना निलंबन, परवाना रद्द, कीटकनाशकांची जप्ती व विक्री बंद आदेश यासारखी कारवाई केली आहे. विषारी कीटकनाशकांमुळे विषबाधा होऊन मृत झालेल्या १८ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत दोन लाख रुपयांचा विमा संरक्षणाचा लाभ देण्याचा प्रस्ताव विमा कंपन्यांकडे दाखल करण्यात आलेला आहे, असेही फुंडकर यांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com