मुंबईत एकवटणार राज्यातील मराठा; मोर्चाची जय्यत तयारी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 जुलै 2017

जिल्ह्यातील मराठा समाजबांधवांकडून मोर्चाची जय्यत तयारी

नांदेड: सकल मराठा समाजातर्फे राज्यभर मूक मोर्चा काढण्यात आला. आता मुंबईत नऊ ऑगस्ट रोजी राज्यातील सर्व मराठा समाज एकत्रित येऊन मोर्चा काढणार आहे. त्याला नांदेड जिल्ह्यातूनही मराठा समाजबांधव मुंबईला जाणार आहेत.

जिल्ह्यातील मराठा समाजबांधवांकडून मोर्चाची जय्यत तयारी

नांदेड: सकल मराठा समाजातर्फे राज्यभर मूक मोर्चा काढण्यात आला. आता मुंबईत नऊ ऑगस्ट रोजी राज्यातील सर्व मराठा समाज एकत्रित येऊन मोर्चा काढणार आहे. त्याला नांदेड जिल्ह्यातूनही मराठा समाजबांधव मुंबईला जाणार आहेत.

यासंदर्भात सकल मराठा समाजाची बैठक रविवारी (ता. 23) विजय नगर येथील हनुमान मंदिर मंगल कार्यालयात झाली. राज्यभर लाखोंचे मोर्चे काढूनही शासन झोपेचे सोंग घेत आहे. मुंबईतील मोर्चानंतरही शासन जागे झाले नाही तर एक दिवस मुंबई बंद पाडून शासनाचा निषेध केला जाईल. शांततेच्या मार्गाने निघणारे मोर्चे शासन वेगवेगळ्या पद्धतीने हाणून पाडण्याचे काम करीत आहे; परंतु ‘माघार घेणारे ते मराठे कसले’, असे म्हणतात ना, ते सत्यात उतरवण्यासाठी आता महाराष्ट्रातील संपूर्ण मराठा समाज एकवटला आहे, असे या बैठकीत ठरविण्यात आले.

रविवारी झालेल्या बैठकीत मुंबईतील मोर्चाचे नियोजन करून विविध मुद्यांवर चर्चा करण्यात येऊन समज-गैरसमज दूर करण्यात आले. मुंबईतील मोर्चाही ‘मूक मोर्चा’च असणार आहे. तेथे कुठलेही हिंसक वळण लागणार नाही, याची दक्षता घेण्यासाठी हजारो स्वयंसेवक नेमण्यात आले आहेत. महिलांची विशेष व्यवस्था व काळजी घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे मोर्चासाठी समाज बांधव कुठलाही निधी रोख स्वरूपात स्वीकारणार नाहीत. ज्यांना मदत करावयाची आहे त्यांनी वस्तू स्वरूपात मदत करण्याचे आवाहन करण्यात आले. मदतीमध्ये बॅच, झेंडे, छोटे बॅनर आदींचा समावेश असेल.

मुंबईतील मोर्चाची वातावरणनिर्मिती म्हणून गावागावात, तालुकातालुक्यांत व शहरांच्या विविध भागांत मराठा समाजाची एकमूठ बांधली जाणार आहे. या बैठकीला समाजातील ज्येष्ठ नागरिक, शेतकरी, डॉक्टर, वैद्यकीय प्रतिनिधी, वकील, इंजिनिअर, विद्यार्थी, महिला, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रात काम करणारे समाजबांधव उपस्थित होते. उर्वरित मुद्यांवर चर्चा करण्यासाठी रविवारी (ता. ३०) पुन्हा हनुमान मंदिर मंगल कार्यालय विजयनगर येथे बैठक होणार आहे. याप्रसंगी जास्तीत जास्त समाजबांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सकल मराठा समाज नांदेड जिल्हा शाखेतर्फे केले आहे.

ई सकाळवरील इतर महत्त्वाच्या बातम्या :