पाऊले चालती भाजपची वाट; राणे शहांच्या भेटीला

टीम ई सकाळ
गुरुवार, 13 एप्रिल 2017

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्री भाजप अध्यक्ष अमित शाह यांची अहमदाबादमध्ये भेट घेतली. त्याच वेळी काल नारायण राणेदेखील अहमदाबादमध्ये होते.

मुंबई : काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्रितपणे बुधवारी रात्री भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची अहमदाबादमध्ये भेट घेतल्याचे वृत्त आहे. 

राणे आणि फडणवीस एकाच गाडीत प्रवास करतानाचे छायाचित्र चर्चेत आले आहे. कारमध्ये नारायण राणे आणि मुख्यमंत्री एकाच सीटवर बसले असल्याचे छायाचित्र 'एबीपी माझा'ने प्रसिद्ध केले आहे. यामुळे राणे खासगी कामासाठी गेल्याचे सांगत असले तरी त्यांच्या भाजप प्रवेशाची शक्यता बळावल्याचे स्पष्ट होत आहे. 

अहमदाबाद भेटीबद्दल विचारले असता, मी खासगी कामासाठी अहमदाबादला जाऊ शकत नाही का, असे राणे म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्री भाजप अध्यक्ष अमित शाह यांची अहमदाबादमध्ये भेट घेतली. त्याच वेळी काल नारायण राणेदेखील अहमदाबादमध्ये होते. त्यामुळे नारायण राणे हे खासगी कामानिमित्त गेले होते की ही राजकीय भेट होती, लवकरच स्पष्ट होईल.

राणे यांनी अहमदाबाद विमानतळावर माध्यमांशी बोलण्याचे टाळले. मात्र, मुंबईत आल्यानंतर खाजगी कामानिमित्त आपण अहमदाबादला जाऊ शकत नाही का असा उलटप्रश्न करीत त्यांनी आपला अहमदाबाद दौरा खाजगी कामासाठी होता असे सांगितले. राणे मुंबईत आल्यानंतर पुढे सिंधुदुर्गला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
 

Web Title: narayan rane meets amit shaha, likely to join bjp