विधवा महिलेची दोन लहानग्यांसह आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

नारायणगाव - मांजरवाडी (ता. जुन्नर) येथील रेश्‍मा विनायक मुळे (वय ३२) या विधवा शेतकरी महिलेने गरिबीला कंटाळून सृष्टी विनायक मुळे (९) व स्वराज विनायक मुळे (६) या आपल्या दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे मांजरवाडी परिसरात शोककळा पसरली आहे.

वर्षापूर्वी पतीचे निधन झाल्यानंतर मांजरवाडीतील रेश्‍मा मुळे यांच्यावर सासू, सासरे यांच्यासह सृष्टी व स्वराज या दोन मुलांच्या संगोपनाची जबाबदारी येऊन पडली. त्या मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होत्या. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सृष्टी तिसरीत, तर स्वराज पहिलीत शिकत होता. अल्पभूधारक असल्याने मोलमजुरीशिवाय उत्पन्नाचे दुसरे साधन नसल्यामुळे रेश्‍मा मुळे तणावाखाली होत्या. अखेर परिस्थितीशी हार मानून दोन लहानग्यांसह त्यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. रविवार (ता. १०) दुपारपासून त्या त्यांच्या मुलांसह बेपत्ता होत्या. सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास मांजरवाडीतील महादू खंडागळे यांच्या विहिरीत रेश्‍मा मुळे यांचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर विहिरीत स्वराज व सृष्टी या दोघांचेही मृतदेह आढळले. आज सायंकाळी सात वाजता शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. आत्महत्येपूर्वी रेश्‍मा यांनी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. पती निधनानंतर सहकार्य केलेल्या व्यक्तींचे त्यांनी आभार मानले असून,  मला माफ करा, असा मजकूर त्यांनी चिठ्ठीत लिहिला आहे.