#NarendraDabholkar : धर्मरक्षणाच्या नावाखाली हत्या 

#NarendraDabholkar : धर्मरक्षणाच्या नावाखाली हत्या 

पुणे - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या दीर्घकालीन कटाचा भाग होती आणि या कटाची व्याप्ती ऍड. गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या हत्यांपर्यंत पोचली आहे, या निष्कर्षापर्यंत केंद्र आणि राज्यस्तरीय तपास संस्था आल्या आहेत. दाभोलकर हत्याप्रकरणी काल (शनिवार) अटक केलेल्या सचिन अंदुरे याच्या पाठोपाठ त्याचे आणखी साथीदार येत्या काही दिवसांत गजाआड होतील, असे तपास यंत्रणेतील सूत्रांनी सांगितले. अत्यंत नियोजनपूर्वक आणि दीर्घकालीन परिणाम लक्षात घेऊन दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आणि लंकेश यांच्या हत्या झाल्या आहेत, यावरही तपास संस्थांचे अधिकारी ठाम आहेत. 

"दुर्जनांचा नाश करायचा, धर्मसंरक्षणासाठी निधी संकलन करायचे आणि शस्त्रसाठा जमा करून संघर्ष करायचा,' हा या साऱ्या हत्यांमागील उद्देश असल्याचे तपासात पुढे येत आहे. कट्टर उजव्या विचारसरणीचे, सनातनी प्रवृत्तीचे घटक त्यासाठी एकत्र आल्याचेही उघड होत आहे. हिंदू जनजागृती समितीचा राज्य समन्वयक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सनातन संस्थेशी संबंधित सारंग अकोलकर, समितीचाच अमोल काळे, सचिन अंदुरे आदींची नावे तपासांत पुढे आली आहेत. त्यांच्या काही साथीदारांची नावेही तपास यंत्रणांना मिळाली आहेत. त्यांनाही येत्या काही काळात अटकसत्र वाढणार आहे, असे सूत्रांनी सांगितले. 

तपासात सहभागी सूत्रांनी नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले, की दाभोलकर यांच्या हत्येसाठी अंदुरे आणि त्याचा साथीदार 20 ऑगस्ट 2013 रोजी औरंगाबादहून पहाटे सहा वाजता पुण्यात पोचले. शनिवार पेठेजवळ एका हॉटेलच्या बाहेर हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल लावलेली होती. तिची बनावट किल्ली हल्लेखोरांकडे होती. ती ताब्यात घेऊन काही वेळ ते शहरात फिरले. त्यानंतर दाभोलकरांची वाट पाहत ते पुलाजवळ थांबले. दोन्ही हल्लेखोरांच्या अंगावर ट्रॅक सूट होते. विठ्ठल रामजी शिंदे पुलावर सीसीटीव्ही नसल्यामुळे त्यांनी त्या जागेची निवड हत्येसाठी केली होती. दाभोलकरांना गोळ्या घातल्या तेव्हा मोटारसायकलवर अंदुरे मागे होता. मोटारसायकल चालविणाऱ्या हल्लेखोराने दाभोलकरांच्या दिशेने दोन गोळ्या घातल्या. त्यातील एक गोळी दाभोलकरांच्या कानाजवळून पार झाली, तर दुसरी गोळी पुलाच्या रेलिंगवर आदळली. त्यामुळे अंदुरे मोटारसायकलवरून उतरून पुढे आला आणि दाभोलकरांच्या छातीच्या दिशेने दोन-तीन गोळ्या झाडल्या. त्यानंतर ते दोघेही मोटारसायकलवरून पळून गेले. 

डॉ. दाभोलकर यांना गोळ्या घालण्यापूर्वी तब्बल दोन वर्षे हल्लेखोरांना पिस्तूल वापरण्याचे प्रशिक्षण दिले गेले असल्याचेही तपासात समजले आहे. गोळ्या डोक्‍याच्याच दिशेने मारण्यावर प्रशिक्षणात भर दिला होता. दाभोलकरांचे लक्ष्य निश्‍चित केल्यावर अंदुरे आणि त्याच्या साथीदाराने पुण्यात तीन-चार वेळा ये-जा केली होती. सारंग अकोलकरचे घर शनिवार पेठेतच आहे. त्यानेही काही टिप्स दिल्या असाव्यात, असा यंत्रणांचा संशय आहे. 

पळून जाण्याला केली मदत 
हल्लेखोरांसाठी दोन पिस्तूल देणे, त्यांच्यासाठी ट्रॅक सूट विकत घेणे, शहर व घटनास्थळाची त्यांना पुरेपूर माहिती देणे, मोटारसायकल उपलब्ध करणे, तिच्या बनावट किल्ल्या तयार करून त्या त्यांच्यापर्यंत पोचविणे, शहरातून बाहेर पलायन करण्यासाठी माहिती देणे यामध्ये वीरेंद्रसिंह तावडे आणि अमोल काळे सक्रिय होते. तसेच हल्ला झाला त्या दिवशी दोघे जण पुण्यात होते, अशीही माहिती तपास यंत्रणांना सचिन अंदुरेच्या जबाबातून मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com