महाराष्ट्राच्या 90 टीएमसी पाण्याचे काय?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

जलअभ्यासकांचा प्रश्‍न - मधुबन धरणाच्या सांडव्यावरील पाण्याचा अभ्यास अपेक्षित

जलअभ्यासकांचा प्रश्‍न - मधुबन धरणाच्या सांडव्यावरील पाण्याचा अभ्यास अपेक्षित
नाशिक - महाराष्ट्राच्या हक्काचे एक थेंबही पाणी गुजरातला जाऊ देणार नाही, असा पुनरुच्चार करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दमणगंगा खोऱ्यातून 25 ते 30 टीएमसी आणि नार-पारच्या खोऱ्यातून 13 टीएमसी पाणी पूर्वेकडे वळविण्यात येणार असल्याचे नाशिकमध्ये सांगितले.

त्यावरून केंद्र सरकारचे 15 हजार कोटी रुपये मिळवण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्राच्या वाट्याच्या 90 टीएमसी पाण्याच्या हक्कावर पाणी सोडणार काय, असा प्रश्‍न जलअभ्यासकांनी उपस्थित केला आहे.
केंद्रीय जलसंपदामंत्री उमा भारती यांना सात जानेवारी 2015 रोजी लिहिलेल्या पत्रातील भूमिकेवर मुख्यमंत्री अजूनही ठाम असल्याचे त्यांच्या कालच्या (ता. 30) येथील वक्तव्यावरुन स्पष्ट झाले आहे.

जलचिंतन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र जाधव म्हणाले, ""डॉ. माधवराव चितळे समितीच्या अहवालानुसार दमणगंगा खोऱ्यात महाराष्ट्राच्या वाट्याचे 83 टीएमसी पाणी असून नार-पार-औरंगा-अंबिका खोऱ्यात 50 टीएमसी पाणी आहे. परंतु केंद्रीय जलआयोगाने कमी केलेल्या पाण्यापैकी मुख्यमंत्र्यांनी दमणगंगा खोऱ्यातून 25 ते 30 टीएमसी व नार-पार खोऱ्यातून 13 टीएमसी असे केवळ 43 टीएमसी पाणी वळवून गोदावरी व गिरणा खोऱ्यातील तूट कमी करण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्र्यांनी ही माहिती देताना राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी चांगला आराखडा तयार केल्याचेही म्हटले आहे.

महाराष्ट्राचे पाणी वळवण्यासाठी केंद्राकडून 15 हजार कोटी रुपये देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. त्यावरून केंद्राच्या 15 हजार कोटींच्या निधीसाठी सरकारने महाराष्ट्राच्या हक्काचे 90 टीएमसी पाणी गुजरातला देण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे.'' याखेरीज दमणगंगा खोऱ्यातील मधुबन धरणाच्या सांडव्यावरून वाहणाऱ्या पाण्याचा अभ्यास होण्याची आवश्‍यकता असल्याचे जलतज्ज्ञांचे मत आहे.

आकडे बोलतात
खोरे पाणलोट क्षेत्र चितळे समिती अहवालानुसार केंद्रीय जलआयोग आणि राष्ट्रीय जलविकास
उपलब्ध पाणी (टीएमसी मध्ये) प्राधिकरणानुसार उपलब्ध पाणी (टीएमसी मध्ये)
दमणगंगा 1 हजार 448 चौरस किलोमीटर 83 52
नार-पार-औरंगा-अंबिका 1 हजार 62 चौरस किलोमीटर 50 29.50

मुख्यमंत्र्यांनी दमणगंगा-पिंजाळ नदीजोड प्रकल्प राबवून गोदावरी खोऱ्यात 25 ते 30 टक्के पाणी वळवण्याचा निर्णय जाहीर केला. याबद्दल त्यांचे अभिनंदन. पण केवळ एवढ्यावरच समाधान मानून उर्वरित पाणी गुजरातला दिल्यास महाराष्ट्राच्या भावी पिढ्यांचे नुकसान होणार आहे, हे लक्षात घेण्याची गरज आहे. गोदावरी व गिरणा या नद्यांचे खोरे तुटीचे असून त्यांची गरज पूर्ण होण्यासाठी आवश्‍यक पाणी उचलण्यासाठी महाराष्ट्राने केंद्राकडे आग्रही भूमिका घेण्याची गरज आहे.
- नितीन भोसले, माजी आमदार, नाशिक

Web Title: nashik maharashtra news what is the 90 tmc water use