शिवसेना-भाजप सरकार म्हणजे काळू-बाळूचा तमाशा

नाशिक - तुपसाखरे लॉन्सवर शनिवारी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी मेळाव्यात बोलताना पक्षाचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार. समोर उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते.
नाशिक - तुपसाखरे लॉन्सवर शनिवारी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी मेळाव्यात बोलताना पक्षाचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार. समोर उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात अजित पवारांचा हल्लाबोल

नाशिक - राज्यातील भाजप-शिवसेनेचे सरकार म्हणजे सावळागोंधळ बरा असे वाटण्यासारखी परिस्थिती आहे. हे सरकार कुणालाच आपले वाटत नसल्याने सर्व घटकांमध्ये सरकारविषयी अस्वस्थता आहे. निव्वळ घोषणाबाजी करणारे हे सरकार अंमलबजावणीच्या पातळीवर काहीही काम करीत नाही. सतत निर्णय बदलणारे व एकमेकांशी भांडण्याची नौटंकी करणारे शिवसेना- भाजपचे सरकार म्हणजे काळू-बाळूचा तमाशा आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप-शिवसेना यांच्यावर कोरडे ओढले. 

राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा आज तुपसाखरे लॉन्स येथे झाला. त्या वेळी कार्यकर्त्यांना खडे बोल सुनावतानाच श्री. पवार यांनी शिवसेनेची दुटप्पी भूमिका व सरकारच्या चुकीच्या निर्णयांवर कठोर शब्दांत टीका केली. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आमदार हेमंत टकले, पंकज भुजबळ, जयंत जाधव, नरहरी झिरवाळ, दीपिका चव्हाण, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, युवती राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा स्मिता पाटील, युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पगार, ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे, माजी आमदार दिलीप बनकर, यतिंद्र पाटील, विजयश्री चुंभळे, रत्नाकर चुंभळे, कोंडाजीमामा आव्हाड, डॉ. भारती पवार, महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, गजानन शेलार आदी उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, की हे सरकार निर्णयांवर ठाम राहू शकत नाही. कर्जमाफीचाच निर्णय घ्या, यासाठी आम्ही विधिमंडळ अधिवेशनात मागणी केली, तेव्हा योग्य वेळी कर्जमाफी जाहीर करणार असल्याचे आणि अभ्यास सुरू असल्याचे सांगितले. मात्र, संघर्षयात्रा, आसूडयात्रा, आत्मक्‍लेश यात्रेनंतर शेतकऱ्यांच्या संपामुळे या सरकारने कर्जमाफीचा निर्णय जाहीर केला. या सरकारच्या नाकर्तेपणामुळे इतिहासात शेतकरी पहिल्यांदा संपावर गेला. सरकारने कर्जमाफी करताना तातडीची दहा हजार रुपयांची मदत जाहीर केली; परंतु अद्याप कुणालाही मदत मिळाली नाही. कर्जमाफी जाहीर केल्यानंतर सरकार रोज निर्णय बदलत आहे. यामुळे बॅंकेच्या अधिकाऱ्यांनाही कोणता निर्णय मानावा, हे समजत नसल्याचा टोला त्यांनी लगावला. कर्जमाफी फसवी असल्याचा आरोपही त्यांनी केला.

पुनर्गठन केलेल्यांना द्या कर्जमाफी
सततच्या दुष्काळामुळे मागील वर्षी जे शेतकरी कर्जाची परतफेड करू शकत नव्हते, त्यांच्या कर्जाचे सरकारने मागील वर्षी पुनर्गठन केले. या वर्षी कर्जमाफी करताना मात्र त्यांना वगळले आहे. पुनर्गठन करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली नव्हती, तरीही सरकारने पुनर्गठन केले. यामुळे ते शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिल्याने सरकारने पुनर्गठन केलेल्या शेतकऱ्यांचेही कर्ज माफ करावे, अशी मागणी पवार यांनी केली. कर्जमाफीची गरज नसलेल्या शेतकऱ्यांना जरूर वगळा, आमचे काहीही म्हणणे नाही, पण एकही गरजू या कर्जमाफीपासून वंचित राहता कामा नये, असा इशारा त्यांनी सरकारला दिला.

...ते माझ्या मनात नाही
शेतकरी कर्जमाफीचा किती शेतकऱ्यांना फायदा झाला, या विषयावर पवार बोलत असताना व्यासपीठावरून कुणीतरी आकडे सांगण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पवार म्हणाले, की अहो, तुम्ही कशाला आकडा लावताय? तो सरकारला जाहीर करू द्या. आपल्याला जिंकणारा आकडा लावायची सवय आहे, असे म्हणताच कार्यकर्ते हसू लागल्यानंतर त्यांनी ‘तुमच्या मनात जे आहे, ते माझ्या मनात नाही, हे लक्षात ठेवा,’ असे स्पष्ट केले. 

शिंदे, शिरसाठ, बिल्लाडे जिल्हाध्यक्ष
पक्षाच्या मेळाव्यानंतर अजित पवार यांनी पक्षाच्या सेल व आघाड्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला. इतर मागासवर्ग सेलच्या जिल्हाध्यक्षपदी ओझरचे राजेंद्र शिंदे, सामाजिक न्याय सेलच्या जिल्हाध्यक्षपदी जिल्हा परिषद सदस्य यशवंत शिरसाठ व युवती जिल्हाध्यक्षपदी येवल्याच्या प्रतीक्षा बिल्लाडे यांची नियुक्ती जाहीर केली. उर्वरित नियुक्‍त्या पुढील टप्प्यात जाहीर करण्यात येतील.

यावेळी महिला अध्यक्षा वाघ, ॲड. पगार, श्री. शेलार यांचीही या वेळी भाषणे झाली. शहराध्यक्ष ठाकरे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, उत्तमबाबा भालेराव, युवक जिल्हाध्यक्ष सचिन पिंगळे, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, कार्याध्यक्ष वैभव देवरे, विद्यार्थी शहराध्यक्ष गौरव गोवर्धने, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष दीपक वाघ, अर्जुन टिळे, शहर सरचिटणीस संजय खैरनार आदी उपस्थित होते.
 

चुलत्याच्या पुण्याईनं बरं चाललंय!
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्याचे ठिकाण तुलनेने लहान असल्याने अनेक कार्यकर्ते उभे होते. याचा उल्लेख करीत पवार म्हणाले, की अनेक कार्यकर्ते उभे आहेत, पण रंजन ठाकरे व रवींद्र पगार बसलेले असल्याने आम्ही बसलो, नाहीतर आम्हीही उभे राहिले असतो. तुम्हाला चांगली जागा मिळाली नाही का? मला माहीत आहे, समस्या असतात. माझ्याही नाशिकमध्ये काही ओळखी आहेत. तुम्ही मला फोन केला असता, तर मी केली असती काहीतरी व्यवस्था. चुलत्याच्या पुण्याईनं माझं बरं चाललं आहे, असे म्हणताच कार्यकर्त्यांमध्ये एकच हशा पिकला.

ढोल कसले वाजवता?
शिवसेनेने कर्जमाफीच्या याद्यांसाठी बॅंकांसमोर ढोल वाजविले. कर्जमाफीचे निर्णय घेताना व निकष ठरविताना शिवसेनेचे मंत्री मंत्रिमंडळाच्या बैठकीत हजर होते. तेथे गप्प बसायचे व इकडे ढोल वाजवायचे. ढोल कसले वाजवता, त्यापेक्षा शिवसेना व भाजपची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेच्या ६० हजार कोटींच्या ठेवी शासनाला कर्जमाफीसाठी ठराविक व्याजदराने द्या, मग तुमचे शेतकरीप्रेम लोकांना कळेल, अशा शब्दांत पवार यांनी शिवसेनेची खिल्ली उडविली. 

शिवसेनेचे दुटप्पी धोरण - तटकरे
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी समृद्धी महामार्गाबाबत शिवसेनेच्या भूमिकेचा समाचार घेतला. सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे भूसंपादन करारावर सही करतात, यासारखे दुटप्पी धोरण दुसरे नाही, अशी टीका तटकरे यांनी केली. महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ म्हणाल्या, की सध्या समाजातील सर्वच घटक दुःखी असताना या देशात फक्त अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोघेच सुखी आहेत. 

दादांची फटकेबाजी
मला अजित पवार गट करायचा नाही, तर राष्ट्रवादी पक्ष मोठा करायचा आहे.
पक्षामुळे १५ वर्षे सत्ता भोगलेल्यांनी आता पक्षासाठी वेळ दिला पाहिजे.
एकीकडे सत्ता भोगायची आणि दुसरीकडे सरकारच्या विरोधात असल्याचे सांगायचे हे शिवसेनेचे दुटप्पी राजकारण.
उद्धव ठाकरेंना माझ्या तोंडात कुठे भ्रष्टाचाराचा बोळा दिसला, इकडे येऊन बघा माझ्या तोंडात दात आणि जीभ आहे.
१५ वर्षांनंतर सत्तेत आलेले हे दोन्ही पक्ष मध्यावधी निवडणुका घेणार नाही. कारण लोकांकडे जाऊन हे काय सांगतील?
उद्धव ठाकरेंनी सभा घेऊन शेतकऱ्यांना हात वर करण्यास सांगण्यापेक्षा त्यांच्या मंत्र्यांना मंत्रिमंडळाच्या बैठकीत हात वर करायला सांगावे.
ठाकरेंना शेतीतील किती कळते, असे विचारले, की त्यांच्या नाकाला मिरच्या झोंबतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com