नॅशनल पार्कमध्ये बिबट्यांवर विषप्रयोग? 

नॅशनल पार्कमध्ये बिबट्यांवर विषप्रयोग? 

मुंबई - बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबट्यांवर विषप्रयोग झाल्याची शक्‍यता आहे. या विषप्रयोगामुळे मंगळवारी (ता. 11) रात्री दहा महिन्यांच्या बिबट्याचा मृत्यू झाला, तर दहा वर्षांचा बिबट्या अत्यवस्थ असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. 

"सूरज' या दहा महिन्यांच्या बिबट्याचा 11 सप्टेंबरला रात्री मृत्यू झाला. त्याचा मृत्यू विषबाधेमुळे झाला असल्याचे शवविच्छेदनातून उघड झाले आहे. पुढील तपासणीसाठी त्याचे आतडे प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. याच दिवशी "भंडारदरा' या बिबट्याचीही प्रकृती खालावल्यामुळे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. गेल्या तीन दिवसांपासून त्याने डोळेही उघडलेले नाहीत. 

सूरजची जुळी बहीण ताराने उलटी केल्यामुळे तिच्यावर विषाचा परिणाम झाला नाही. दुसरा एक बिबट्या तंदुरुस्त असल्याने तो यातून बचावला. सूरज आणि तारा हे नगर जिल्ह्यातील एका शेतात आढळले होते. तर भंडारदरा या बिबट्याला भंडारदरा येथून आणले होते. चौथ्या बिबट्याला आरे वसाहतीतून आणले होते. या चौघांनाही राष्ट्रीय उद्यानातील बिबट्या निवारा केंद्रात ठेवले होते. त्यांना सोमवारी (ता. 10) सायंकाळी साडेचारला जेवण्यासाठी बिफ देण्यात आले. मंगळवारी (ता. 11) सकाळपासून या चौघांची प्रकृती खालावू लागली. भंडारदरा हा बिबट्या लोळू लागल्यामुळे त्याच्यावर तत्काळ उपचार करण्यात आले. त्याची प्रकृती अद्याप चिंताजनक आहे. सूरज सकाळी अचानक कोसळला. मात्र उपचारादरम्यान रात्री त्याचा मृत्यू झाला. 

या चारही बिबट्यांना एकाच वेळी विषबाधा झाल्याने हा विषप्रयोग असण्याची शक्‍यताही वर्तविली जात आहे. या बाबत अधिक माहिती घेण्यासाठी उद्यानाचे मुख्य वन संरक्षक आणि संचालक अन्वर अहमद यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र संपर्क होऊ शकला नाही. 

सूरज बिबट्याचे शवविच्छेदन झाले असून, त्यात विषबाधेमुळे त्याचा मृत्यू झाला आहे. विष कोणत्या प्रकारचे होते हे तपासण्यासाठी त्याच्या आतड्या राज्य सरकारच्या प्रयोग शाळेत पाठवल्या आहेत. 
- डॉ. शैलेश पेठे, पशुवैद्यकिय अधिकार, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com