'आयडिया ऑफ इंडिया'साठी राष्ट्रसेवा दलाची देशव्यापी मोहीम

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 7 मे 2017

महात्मा गांधींच्या 150व्या जयंतीनिमित्त कार्यक्रम

महात्मा गांधींच्या 150व्या जयंतीनिमित्त कार्यक्रम
मुंबई - देशभरात 2018-2019 हे वर्ष महात्मा गांधीजींचे 150 वे जयंती वर्ष म्हणून साजरे करत "आयडिया ऑफ इंडिया' ही महात्मा गांधींच्या स्वप्नातील भारताची कल्पना साकार करण्यासाठी राष्ट्रसेवा दल देशभर विचार जागरण करणार आहे. त्यासाठी देशातील विविध राज्यांत व्याख्याने, चर्चासत्र, परिसंवाद, शिबिरे, सेवा कार्यक्रम आयोजित करणार आहोत, अशी माहिती राष्ट्रसेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सुरेश खैरनार यांनी शनिवारी दिली.

डॉ. खैरनार यांची नुकतीच राष्ट्रसेवा दलाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. आज मुंबईत पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत ते पत्रकारांशी संवाद साधत होते. ते म्हणाले, की देशातील सर्व पुरोगामी, जाती-धर्मनिरपेक्ष समतावादी शक्तींच्या एकजुटीतून रा. स्व. संघमुक्त भारत करण्यासाठी आम्ही लढणार आहोत. 125 कोटी लोकांच्या या देशात द्वेषाचा विचार आम्ही रुजू देणार नाही. देश तोडणाऱ्या शक्तींपासून लोकांना सावध करण्यासाठी आमची ही लढाई सुरू आहे. त्यासाठी मी देशभर दौरा करत आहे.

सेवा दलाने शेतकरी पंचायत सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शेती आणि शेतकरी यांच्या विकासाचे धोरण कसे असावे, त्यांना येणाऱ्या अडीअडचणींसंदर्भात लढा उभारण्याचे काम राष्ट्रसेवा दल करणार आहे. शेतकऱ्यांनी 1 जून 2017 पासून पुकारलेल्या संपाला आणि लढ्याला डॉ. खैरनार यांनी जाहीर पाठिंबा व्यक्त केला आहे.