नायगावात पर्यटन विकासाला चालना देऊ - राम शिंदे

ramshinde
ramshinde

लोणंद - ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव नायगाव हे त्यांच्या महान कार्यामुळे जगाच्या नकाशावर आले आहे. आजवर नायगावचा विविध अंगाने विकास साधला गेला. यापुढेही या पवित्र भूमीचा विकास सुरू ठेवू. विशेष विकास आराखडा आखून या गावाचा परिपूर्ण विकास साधू. नदी पुनरुज्जीवन योजनेंतर्गत कृषी व पर्यटन विकासाला चालना देऊन महिलांसाठी देशपातळीवरील पॉलिटेक्‍निक महाविद्यालय उभे राहावे, यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करू, असे आश्‍वासन जलसंधारणमंत्री राम शिंदे यांनी आज दिले. 

क्रांतिज्योती सावित्रीबाई यांच्या 186 व्या जयंतीनिमित्त नायगावला (ता. खंडाळा) झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर अध्यक्षस्थानी होते. पालकमंत्री विजय शिवतारे, आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुभाषराव नरळे, कर्जतचे नगराध्यक्ष नामदेवराव राऊत, जिल्हाधिकारी आश्‍विन मुद्‌गल, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक विजय पवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख, कृष्णकांत कुदळे, डॉ. कैलास कमोद, शेफाली भुजबळ, विशाखा भुजबळ आदी उपस्थित होते. 

मंत्री राम शिंदे म्हणाले, ""नायगावच्या विकासात आजवर अनेकांनी गट-तट व पक्ष विसरून योगदान दिले आहे. त्यामध्ये माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे नाव अग्रेसर आहे. नायगावच्या विकासासाठी एक कोटी 86 लाखांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली असून, 86 लाख रुपयांचा निधी या कामासाठी वर्गही केला आहे.'' 

रामराजे म्हणाले, ""सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांचे क्रांतिकारी विचार प्रत्येकात रुजल्याखेरीज सामाजिक प्रगती साधता येणार नाही. महिला सक्षम झाल्या पाहिजेत. महिलांनी स्वतः सक्षम होण्याचा संकल्प केला पाहिजे.'' 

पालकमंत्री शिवतारे म्हणाले, ""फुले दांपत्याने आपले संपूर्ण आयुष्य समाजासाठी अर्पित केले होते. महिला पंतप्रधान पदापर्यंत पोचल्या असल्या, तरी आजही समाजात महिलांना जेवढा सन्मान मिळायला पाहिजे तेवढा मिळत नाही. पुरुषांनी महिलांना निर्णय प्रक्रियेत सामावून घेतले पाहिजे, तरच सक्षम समाजनिर्मिती होऊ शकेल.'' 

आमदार मकरंद पाटील, खंडाळा पंचायत समितीचे सभापती नितीन भरगुडे-पाटील, उपसभापती सारिका माने, जिल्हा परिषदेच्या सदस्या स्वाती बरदाडे, कर्जतचे नगराध्यक्ष नामदेवराव राऊत, नायगावचे सरपंच मनोज नेवसे आदींची भाषणे झाली. 

सुरवातीला रामराजे, मंत्री राम शिंदे, आमदार मकरंद पाटील, आमदार शशिकांत शिंदे व अन्य मान्यवरांनी फुले दांपत्यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 

संपतराव नेवसे, नितीन झगडे, अर्चना देवडे, सुजाता नेवसे, सुधीर नेवसे यांनी स्वागत केले. दशरथ ननावरे व श्री. कासुर्डे यांनी सूत्रसंचालन केले. बापूसाहेब भुजबळ यांनी आभार मानले. 

राज्यभरातील महिलांची हजेरी 
कार्यक्रमासाठी राज्यभरातून महिलांनी हजेरी लावली होती. पालखी व दिंडी सोहळा स्मारकांपासून कार्यक्रम स्थळापर्यंत वाजत गाजत आणण्यात आला. नायगाव ग्रामस्थांच्या वतीने बाहेरगावाहून येणाऱ्या महिलांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com