मुख्यमंत्री तुम्हालाही वाण नाही पण गुण लागला : अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 जून 2018

पंतप्रधान नरेंद्र मोदी सतत परदेशात फिरत असतात आता मुख्यमंत्रीही परदेशात गेले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनाही वाण नाही गुण लागला, अशी बोचरी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी सतत परदेशात फिरत असतात आता मुख्यमंत्रीही परदेशात गेले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनाही वाण नाही पण गुण लागला, अशी बोचरी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसची पश्चिम महाराष्ट्रातील हल्लाबोल आंदोलनाची आज (रविवार) पुण्यात सांगता सभा होत आहे. या सभेला पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, छगन भुजबळ, जयंत पाटील, प्रफुल पटेल, सुप्रिया सुळे, सुनील तटकरे आदी प्रमुख नेते उपस्थित होते

अजित पवार म्हणाले, की चार वर्षांत सरकारने कसे वाटोळे केले याची आपण पुस्तिका काढत आहोत. हजारो कोटी बुडवून अनेकजण परदेशात पळून गेले. सतत संप होत आहेत, याबद्दल आगोदर तोडगा का काढत नाही. गेल्या दहा दिवसांपासून शेतकरी संपावर आहेत. हे राज्यकर्ते कशासाठी काम करतात याचे आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे.

देशभरातील वातावरण बदलत आहे. ही पश्चिम महाराष्ट्रातील हल्लाबोलची सांगता सभा असली तरी यापुढे आंदोलन सुरुच राहणार. एवढ्या समस्या असताना माधुरीला भेटून काय होते ? शेवटच्या माणसापरयत पोचले पाहिजे. आपल्याला विदर्भात विजय मिळाला आहे. पश्चिम महाराष्ट्र आपला गढ आहे, त्यामुळे याठिकाणी आपले वर्चस्व राहिलेच पाहिजे.

Web Title: NCP Ajit Pawar Criticizes CM Devendra Fadnavis