निवडणुकांच्या तोंडावर राज्यात नऊ नवे पक्ष

- संपत देवगिरे
रविवार, 29 जानेवारी 2017

उत्तर महाराष्ट्रात 29 राजकीय पक्ष

उत्तर महाराष्ट्रात 29 राजकीय पक्ष
नाशिक - निवडणुका आल्या की पक्षांतराचा हंगाम सुरू होतो. सध्या मात्र विचारसरणी, ध्येय, धोरण सगळेच केवळ निवडणुका जिंकणे आणि राजकीय तडजोडीवर भर दिला जात असल्याने महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांच्या तोंडावरच राज्यात गेल्या आठवड्यात राष्ट्रीय मराठा पार्टीसह नऊ नव्या पक्षांची नोंदणी झाली आहे. यातील बहुतांशी पक्ष व त्यांचे नेते राजकीयदृष्ट्या फारसे परिचित नसल्याने त्यांचा राज्याच्या अथवा स्थानिक राजकारणावरही कितपत प्रभाव पडेल हे अनिश्‍चित आहे.

नुकत्याच नोंदणी झालेल्या पक्षांत नाशिकच्या भारतीय वडार समाज संघर्ष पार्टीसह मोहन जगताप मित्रमंडळ आघाडी (बीड), बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी (मुंबई), राष्ट्रीय मराठा पार्टी (लातूर), सेवा साम्राज्य पार्टी (परभणी), सांगोला शहर विकास महायुती (सोलापूर), मराठवाडा मुक्ती मोर्चा (जालना), भीमा परिसर विकास आघाडी पक्ष (सोलापूर) आणि युनायटेड कॉंग्रेस पार्टी (मुंबई) यांचा समावेश आहे. राज्य निवडणूक आयोगाचे अवर सचिव रिना फणसेकर यांनी याविषयीचे परिपत्रक काढले आहे.

राज्यात गेल्या महिन्यात 357 राजकीय पक्ष होते. हिशेब व अन्य प्रशासकीय पूर्ततांअभावी यातील 231 पक्षांची नोंदणी आयोगाने रद्द केली. त्यानंतर सव्वीस नव्या पक्षांची नोंदणी झाली होती. त्यात आता गेल्या आठवड्यातील सात पक्षांची भर पडल्याने राज्य निवडणूक आयोगाच्या दप्तरी 159 राजकीय पक्ष आहेत. यामध्ये माकपा, भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाकप, बसप आणि कॉंग्रेस या सहा राष्ट्रीय पक्षांसह शिवसेना आणि मनसे या दोन राज्यस्तरीय पक्षांचाही समावेश आहे.