जिल्ह्यातील साडेनऊ हजार शेतकरी ठरू शकतात पात्र! 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 एप्रिल 2017

सातारा - एक लाखापर्यंतच्या थकित पीक कर्जाची माहिती मागवून घेणारे सहकार विभागाचे पत्र जिल्हा बॅंकेला प्राप्त झाले असून, कर्जमाफीचा निर्णय झाल्यास या निकषानुसार जिल्ह्यातील साडेनऊ हजार शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरण्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यांची कर्जाची रक्कम साधारण 90 कोटींच्या घरात जाते आहे. 

उत्तर प्रदेशातील योगी सरकारने शेतकऱ्यांना एक लाखापर्यंतच्या पीक कर्जाला माफी दिली. त्याच आधारे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा निर्णय घेतला जाण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. देवेंद्र फडणवीस सरकार आता या मुद्‌द्यावर निर्णय घेण्याच्या परिस्थितीत आले आहे. याचे पहिले पाऊल म्हणजे राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांतून शेतकऱ्यांना दिलेल्या पीक कर्जाची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. सर्व जिल्हा बॅंकांकडून 31 मार्च 2017 पर्यंत एक लाखापर्यंत थकीत पीक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांची माहिती व कर्जाचा आकडा मागविला आहे. त्यानुसार सर्व जिल्हा बॅंकांनी माहिती संकलित करण्याचे काम सुरू केले आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेकडे एक लाखापर्यंत थकित पीककर्ज असलेले सुमारे 9500 शेतकरी आहेत. त्यांची कर्जाची रक्कम साधारण 90 कोटींच्या घरात जात आहे. त्यामुळे कर्जमाफीचा निर्णय झाल्यास साडेनऊ हजार शेतकरी पात्र ठरण्याची शक्‍यता आहे. 

सरसकट कर्जमाफी हवी 
मुख्यमंत्री प्रत्येकवेळी थकित कर्जदारांचा विचार करू, असे म्हणत होते. त्यानुसार त्यांनी थकित असलेल्याच शेतकऱ्यांची माहिती जिल्हा बॅंकांकडून मागविली आहे; पण ज्यांनी नियमित कर्ज भरले, अशा शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये, यासाठी सरसकट कर्जमाफी देण्याचा विचार झाला पाहिजे, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.