नोटाबंदीनंतर अर्थव्यवस्था मजबूत होईल - रिझर्व्ह बॅंक 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 30 डिसेंबर 2016

मुंबई - नोटाबंदीमुळे बॅंकिंग व्यवस्थेवरील ताण वाढला असला तरी या मोहिमेनंतर अर्थव्यवस्था मजबूत होईल, असा विश्‍वास रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी गुरुवारी व्यक्त केला. 

मुंबई - नोटाबंदीमुळे बॅंकिंग व्यवस्थेवरील ताण वाढला असला तरी या मोहिमेनंतर अर्थव्यवस्था मजबूत होईल, असा विश्‍वास रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी गुरुवारी व्यक्त केला. 

पटेल यांनी आज आर्थिक स्थैर्य अहवाल जाहीर केला. या वेळी ते बोलत होते. ते म्हणाले, ""चलनातून पाचशे आणि हजारच्या नोटा रद्द केल्यामुळे नागरिकांना त्रास झाला. याचा अर्थव्यवस्थेवर तात्पुरता परिणाम होईल. मात्र, अर्थव्यवस्थेच्या परिवर्तनाकरिता नोटाबंदी फायदेशीर ठरेल. डिजिटल साधनांचा वापर वाढल्याने अर्थव्यवस्था पारदर्शक होण्यास चालना मिळेल.'' 
वस्तू आणि सेवा कर (जीएसटी), दिवाळखोरी विधेयक यासारख्या आर्थिक सुधारणांचे चांगले परिणाम अर्थव्यवस्थेवर दिसून येतील. बुडीत कर्जांच्या वसुलीसाठी दिवाळखोरी कायदा, महागाई दरात झालेली घसरण यामुळे मरगळलेल्या अर्थव्यवस्थेला उभारी मिळेल, असा विश्‍वास या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.