शेतकरी कर्जमाफी तूर्तास अशक्‍यच - फडणवीस

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 25 मार्च 2017

मुंबई - शेतकरी कर्जमाफीवरून निलंबित आमदारांच्या निषेधार्थ विधिमंडळात विरोधकांनी घातलेला बहिष्कार, शिवसेनेने विधानसभेत कर्जमाफीचा लावून धरलेला मुद्द्यावर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे ही मागणी व भूमिका रास्त असली, तरी सरसकट एक कोटी 31 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्यास राज्याची बॅंकिंग व्यवस्थाच कोलमडून पडेल, अशी भीती त्यांनी विधानसभेत व्यक्त केली. मात्र, 31 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत सरकार सकारात्मक विचार करून विशेष योजना तयार करेल, असा विश्वासही त्यांनी दिला.

विधानसभेत काल शिवसेना आमदारांनी कर्जमाफीवरून "पॉइंट ऑफ इन्फर्मेशन'च्या माध्यमातून चर्चा उपस्थित केली होती. त्यावर निवेदन करताना फडणवीस यांनी आज कर्जमाफी तूर्तास अशक्‍य असल्याचे सूचित केले. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी आपण चर्चा केली असून, एक दिवसात कर्जमाफीचा निर्णय घेता येणार नाही याची माहिती दिल्याचे ते म्हणाले आणि कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस शिवसेनेच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा टोला फडणवीस यांनी लगावला.

कर्जमाफीचा निर्णय घेताना त्याचा लाभ बॅंकांना होणार नाही, जे कायम कर्ज बुडवणारे मोठे शेतकरी आहेत त्यांनाही लाभ होणार नाही, याचा अभ्यास करूनच निर्णय घ्यावा लागेल. पण त्याचबरोबर जे शेतकरी प्रामाणिकपणाने कर्जाचा भरणा करतात त्यांच्यावरही अन्याय होणार नाही, याची दक्षता घ्यायला हवी, असे त्यांनी स्पष्ट केले.

कर्जाचे हप्ते थांबवू नयेत
जे शेतकरी नियमित कर्जाचे हप्ते भरतात त्यांनी कर्जमाफी होणार यावर भरोसा ठेवून कर्जाचे हप्ते भरण्याचे थांबवू नयेत. ज्यांची कर्ज भरण्याची क्षमता आहे त्यांनी हप्ते भरावेत. अन्यथा कर्जमाफीच्या सवयीमुळे तुम्हीसुद्धा कर्जबाजारी व्हाल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Web Title: now Farmers waiver impossible