सरकारी रक्तपेढ्या लवकरच ऑनलाईन 

हर्षदा परब - सकाळ वृत्तसेवा 
शनिवार, 7 जानेवारी 2017

मुंबई - राज्यातील 70 सरकारी रक्तपेढ्या एप्रिलपर्यंत ऑनलाईन होणार आहेत. त्यानंतर खासगी रक्तपेढ्यांवरही अशी सक्ती होण्याची शक्‍यता आहे, असे आरोग्य विभागातील सूत्रांनी सांगितले. 

मुंबई - राज्यातील 70 सरकारी रक्तपेढ्या एप्रिलपर्यंत ऑनलाईन होणार आहेत. त्यानंतर खासगी रक्तपेढ्यांवरही अशी सक्ती होण्याची शक्‍यता आहे, असे आरोग्य विभागातील सूत्रांनी सांगितले. 

पंतप्रधान योजनेनुसार देशातील सर्व सरकारी रक्तपेढ्या ऑनलाईन करण्यात येत आहेत. त्यानुसार नॅशनल एड्‌स कंट्रोल सोसायटीने (नॅको) एक सॉफ्टवेअर तयार केले आहे. सॉफ्टवेअरच्या आधारे प्रायोगिक तत्त्वावर राज्यात उस्मानाबादमधील जिल्हा रुग्णालयात ई-ब्लड बॅंक सुरू करण्यात आली आहे. याच धर्तीवर राज्यातील 70 रक्तपेढ्या ऑनलाईन होणार असल्याचे राज्याचे आरोग्य विभागाचे संचालक डॉ. सतीश पवार यांनी सांगितले. या ई-ब्लड बॅंकांमुळे एका क्‍लिकवर रक्त किंवा रक्त घटकाचा साठा ऑनलाईन पाहून मागणी करणे रुग्णांच्या नातेवाइकांना सोईस्कर होईल. रक्तपेढ्यांचा कारभार पारदर्शी होण्यासही मदत होईल. 

सरकारी रक्तपेढ्यांपेक्षा अधिक रक्त खासगी रक्तपेढ्यांमधून वापरण्यात येते. अनेकदा अवाजवी किंमत आकारून हा रक्तपुरवठा करण्यात येतो. यामुळे सरकारी रक्तपेढ्यांनंतर खासगी रक्तपेढ्यांवरही सक्ती होण्याची शक्‍यता आहे. 11 जानेवारीला होणाऱ्या बैठकीत याबद्दल निर्णय होण्याची शक्‍यता आहे, असे आरोग्य विभागातील अधिकाऱ्याने सांगितले. ई-रक्तकोष या उपक्रमांतर्गत खासगी रक्तपेढ्यांनी ऑनलाईन करण्याची विनंती यापूर्वीच केली आहे, असे डॉ. पवार यांनी सांगितले. किती रक्तपेढ्यांनी ही पद्धत अवलंबली आहे, हे 11 जानेवारीला स्पष्ट होईल, असे ते म्हणाले. 

1 डिसेंबरला सुरू झालेल्या या ई-ब्लड बॅंकेचे 22 डिसेंबरला आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले. डिसेंबरमध्ये रक्तपेढीतून 103 युनिट रक्त ऑनलाईन पद्धतीने मागवण्यात आल्याची माहिती उस्मानाबादचे जिल्हा शल्याचिकित्सक डॉ. एकनाथ माले यांनी दिली. 50 किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर असलेल्या रुग्णालयात रक्त पोहचवण्यासाठी जीवन अमृत (104 क्रमांकाच्या) सेवेची मदत घेण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले. या ई-ब्लड बॅंकेमुळे रक्तदात्यांचीही ऑनलाईन नोंदणी होणार आहे. राज्यातील सर्व रक्तपेढ्यांतील रक्तपुरवठा एका क्‍लिकवर मिळाल्यास रुग्णांच्या नातेवाइकांना मोठा दिलासा मिळेल, असे डॉ. माले यांनी सांगितले. 

राज्यातील सरकारी रक्तपेढ्या - 70 
वर्षाला लागणारा रक्तपुरवठा - 10 लाख युनिट 
सरकारी रक्तपेढ्यांतून होणारा पुरवठा - 3 लाख युनिट 
देशातील इतर ई-ब्लड बॅंक - एम्स (रायपूर), नवी मुंबई महापालिका